
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यात 8 लाख 60 हजार 258 अंगठेबहाद्दर असल्याचे आढळून आले आहे. अनेकांना अक्षरओळख नाही. पण, मोबाईल हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे.
शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाने जिल्हानिहाय निरक्षरांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत राज्यात 1 कोटी 63 लाख निरक्षर आहेत. यात पुणे जिल्ह्यात 10 लाख 67 हजार 823 लोक निरक्षर आहे. नाशिक जिल्ह्यात 8 लाख 60 हजार 258 निरक्षरांची नोंद झालीे. त्यापाठोपाठ सोलापूर, नगर, पालघर, जळगाव, मुंबई, नांदेड, ठाणे अशा नऊ जिल्ह्यांतच 73 लाख 61 लाख 460 निरक्षर सापडले.
या निरक्षरांना काहीही करून 2027 पर्यंत साक्षर केले जाणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत यंदा 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर केले जाईल. नवसाक्षरांच्या शोध घेण्यासाठी व अचूक सर्वेक्षणासाठी प्रत्येक 10 व्यक्तींमागे एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून यासाठी काम करता येणार आहे.
प्रथम 15 वर्षांवरील वयोगटातील लोकांना साक्षर केले जाईल. महिला-मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाईल. 2021 च्या जनगणनेतील निरक्षर संख्येनुसार 12 लाख 40 हजार निरक्षर नागरिकांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे.