पंचायतराज समितीची जिल्हा दौर्‍याची आढावा बैठक

अधिकारी धारेवर
पंचायतराज समितीची जिल्हा दौर्‍याची आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने ( Panchayat Raj Committee of the Legislature ) जिल्हा दौर्‍यात केलेल्या आढावा, भेटी व तक्रारींचे संतप्त पडसाद अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) सभागृहात झालेल्या बैठकीत उमटले.

समिती सदस्यांनी आलेल्या अनुभवाच्या आधारे कामकाजाचे वाभाडे काढत, प्रशासनाला धारेवर धरत विचारणा केल्याची चर्चा आहे. काही अधिकार्‍यांच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच कामात सुधारणा करण्याची तंबी दिली. दरम्यान, समारोपात समितीने प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक जिल्हा दौर्‍यावर असलेल्या पंचायतराज समितीने अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद सभागृहात तब्बल चार ते साडेचार तास आढावा घेतला. गटनिहाय झालेल्या समिती सदस्यांच्या दौर्‍यात प्राप्त झालेल्या कामकाजाच्या, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या तक्रारी, अधिकारी, सेवकांच्या झाडाझडतीत आलेल्या अनुभवाच्या आधारे आढावा घेण्यास सुरुवात केली. निफाड तालुक्यात रस्त्यांची कामे झाली. मात्र साईडपट्ट्यांची कामे झालेली नसताना या कामांची बिले काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने समिती सदस्यांनी संबंधित अधिकार्‍यास विचारणा केल्याचे कळते. इगतपुरी तालुक्यातील एका गावात बंधारा बांधकाम झालेले नसताना त्याचे बिल काढण्याचा प्रकार सदस्यांनी सांगत अधिकार्‍यांना प्रश्न उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वादग्रस्त वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या कामातील अनियमिततेचा विषय समिती बैठकीत चांगलाच गाजला. याबाबत आलेल्या तक्रारींवरून समिती सदस्यांनी अधिकार्‍यांसह प्रशासनाला चांगलाच जाब विचारला. या प्रकरणी प्रशासकीय काय कारवाई केली, दोषींवरील कारवाई, ठेकेदार न्यायालयात गेला तर तुम्ही का न्यायालयात गेले नाही, अद्याप गुन्हा दाखल का झाला का नाही? आदींबाबत विचारणा केली. यातील उत्तरे समाधानकारक नसल्याने सदस्यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. या रस्त्यांच्या काढलेल्या बिलांची वसुली करण्याचे आदेश यावेळी दिल्याचे सांगितले जात आहे. कळवण तालुका दौर्‍यात उपअभियंत्यांकडून मिळालेली उत्तरे सांगण्यात आली. आम्हा लोकप्रतिनिधींना अशी उत्तरे दिली जात असतील तर सामान्यांचे काय? असा सवाल सदस्यांनी प्रशासनाला करत खडेबोल सुनावल्याचे समजते.

प्रशासन अडचणीत

पंचायतराज समितीला शिक्षण विभागाने दिलेली माहिती व समितीच्या सदस्यांनी केलेल्या पाहणीत मोठी तफावत आढळून आल्याने शिक्षकांसह प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे. पंचायतराज समितीच्या प्रश्नांना प्रशासनाच्या वतीने अगोदरच बुकलेटच्या माध्यमातून लेखी उत्तरे देण्यात आली आहेत.

प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तराची शहानिशा करण्यासाठी समिती सदस्य प्रशांत बंब यांनी संपूर्ण जिल्ह्यात 40 हून अधिक पथके पाठवून माहिती संकलित केल्याची चर्चा असून या माहितीत मुख्यालयात बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक राहत असल्याचे वास्तव बैठकीत निर्देशनास आणून दिल्याचे कळते. पथकाने गावातील सरपंचांसह ग्रामस्थांशी चर्चा करून माहिती संकलित केली.

मात्र प्रशासनाने दिलेल्या माहितीत जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 10 हजार 959 शिक्षक कार्यरत असून हे सर्व शिक्षक मुख्यालयात राहत असल्याचे लेखी उत्तर देण्यात आल्याचे समजते. याशिवाय अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे पथकाच्या सर्व्हेद्वारे प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिल्याने प्रशासनाची बोलती बंद झाल्याचे कळते. हा विषय चांगलाच गाजल्याची चर्चा आहे.

पिंगळे, परदेशी यांचे कौतुक

दरम्यान, समिती सदस्यांनी अखेरच्या दिवशी झालेल्या बैठकीत प्रशासनाच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या असल्या तरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व रवींद्र परेदशी यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे समारोपप्रसंगी विशेष कौतुक केल्याचे समजते. दोघांच्या विभागातील कामकाज चांगले असल्याचे सांगत समितीने त्यांना शाबासकीची थाप देत त्यांचा गौरव केल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com