नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यात करोना लसीकरणाची तयारी आरोग्य विभागातर्फे पूर्ण करण्यात आली असून ड्रायरनसाठी जिल्हा सज्ज आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ५५ लाख नागरिकांचे लसीकरणाचे नियोजन असून त्यासाठी दहा लाख लस साठवण क्षमता तयार केल्याची माहिती या मोहिमेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.

या आठवड्यातच लसीकरणाचा ड्रायरन केला जाणार असल्याचे समजते. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण केले जाणार आहे.

यामुळे आरोग्य विभागाकडून पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका व ग्रामीण भाग मिळून पहिल्या टप्प्यात ३० हजार १६४ जणांचे लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका व इतर सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यासह खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे.

लसीकरण करण्यासाठी ६०० जणांची नियुक्ती करण्यात आली असून एक व्यक्ती शंभर जणांना एका दिवसात लस देणार आहे. यामुळे जिल्ह्यात एका दिवसामध्ये ६० हजार जणांना लस देण्याची क्षमता उपलब्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रायरन जिल्ह्यात नाशिक महापालिका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथिमक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी लसीकरण करून लसीकरण मोहिमेचा ड्रायरन केला जाणार असल्याचे समजते. यावेळी प्रत्येक केंद्रावर २५ जणांचे दिवसभरात लसीकरण केले जाणार आहे. यात आरोेग्य सेवक व वैद्यकीय अधिकारी यांना लसीकरण केले जाणार आहे.

अशी आहे तयारी 55 लक्ष लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट लस साठवण क्षमता 10 लक्ष रोज 60 हजार लोकांना लस देता येणार लसीकरण केंद्रावर नोंदणी, लसीकरण व त्यानंतर अर्धातास निगराणीखाली ठेवण्यासाठी अशा तीन खोल्या असणार.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी,खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दुसऱ्या टप्प्यात होम गार्ड, पोलीस, स्वच्छता कर्मचाऱ्यांना लस तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस.