जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : बिनविरोध निवडीसाठी बैठकांना जोर

राजेंद्र भोसले बिनविरोध
जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : बिनविरोध निवडीसाठी बैठकांना जोर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या (District Labor Federation Election: )संचालक पदासाठीच्या काही जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मिसळ पार्टी नंतर मंगळवारी (दि.२२) देखील नेत्यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बिनविरोधासाठी बैठक झाली. मात्र, इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे नेत्यांच्या लक्षात आले.त्यामुळे ज्याचे त्याने आपापल्या ताकदीवर लढावे, असे संकेत पॅनल प्रमुखांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, मालेगाव तालुका संचालक पदासाठी संघाचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका गटाची निवड ही बिनविरोध व्हावी,यासाठी एका इच्छुक उमेदवाराने नेत्यांच्या उपस्थितीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, यातून काहीच ठोस पर्याय निघाला नाही.'नेते आणि इच्छुक बैठकीला आले आणि मिसळवर ताव मारून गेले' अशी चर्चा या मिसळ पार्टी नंतर रंगली होती.

दरम्यान, मंगळवारी (दि.२२) पुन्हा एकदा बिनविरोध निवडणूक कोणत्या कोणत्या जागावर होईल, यासाठी पॅनलचे प्रमुख नेते राजेंद्र भोसले, केदा आहेर, संपतराव सकाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संघाच्या कार्यालयाजवळील हॉलमध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले असल्याने कोणाला थांबवावे असा पेच पॅनल प्रमुखांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या नेत्यांनी ज्याच्या त्याच्या परीने निवडणूक लढवावी, जे निवडून येतील ते आमच्याबरोबर. अशी भूमिका घेतल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.दरम्यान, गुरुवार दि.२४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून दोन दिवसात हालचालींना वेग येणार आहे.

राजेंद्र भोसले बिनविरोध

मालेगांव तालुका संचालक प्रतिनिधीपदी माजी चेअरमन राजेंद्र लक्ष्मण भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. युवराज गोलाईत व शंकरराव ठाकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजेंद्र भोसले यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यानंतर आता राजेंद्र भोसले यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राजेंद्र भोसले यांचे संपतराव सकाळे,मालेगावचे माजी उपमहापौर सुनील आहेर,युवराज गोलाईत,शंकरराव ठाकरे,कृष्णराव पारखे तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. या निवडणुकीसाठी माघारीसाठी मोठी मुदत मिळाल्यामुळे तालुका गटातून बिनविरोध निवड करण्यासाठी इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न जोमाने सुरू आहे. मजूर संघाच्या २० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज व छाननीची प्रकिया पूर्ण होऊन गुरुवार, दि. २४ पर्यंत माघारीची मुदत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com