उगावला जिल्हा बँकेच्या नोटिसांची होळी

जप्तीची कारवाई थांबवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
उगावला जिल्हा बँकेच्या नोटिसांची होळी

उगाव । वार्ताहर

येथील नाशिक जिल्हा बँक शाखेने संस्थेमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांची मालमत्ता जप्त करून त्याचे लिलाव करण्याच्या नोटिसा शेतकर्‍यांना पाठवल्याने संपूर्ण परिसरात या मोहिमेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असतानाच गुरुवारी येथील ग्रामपालिकेसमोर संतप्त शेतकर्‍यांनी या नोटिसांची होळी करत जिल्हा बँकेच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला.

सध्याच्या करोनाकाळात कधी नव्हे एवढा शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. अशातच नाशिक जिल्हा बँकेने शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर बँकेचे नाव लावण्याचा आणि स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा जो घाट घातला आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी उगाव येथे शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष मधुकर ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली या नोटिसांची होळी करून बँकेचा निषेध करण्यात आला.

मागील वर्षापासून करोना प्रादुर्भावामुळे पिकांची पुरती वाट लागली आहे. तर यावर्षी पिके उभी करण्यासाठी भांडवल नाही. आता कुठे बाजारपेठा सुरळीत होत असून शेतकरी घरातील दागिने मोडून तर कुठे उसनवारी करत पिके उभी करू लागले आहेत. द्राक्षबागेसाठीदेखील इकडून तिकडून थोडेफार पैसे जमा करून द्राक्ष हंगाम उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शेतकरी अडचणीतून मार्गक्रमण करत असतानाच जिल्हा बँकेने थकबाकीदर शेतकर्‍यांना जप्तीच्या नोटिसा पाठवून त्यांच्या सातबारा उतार्‍यावर बँकेचे नाव लावून जप्तीची व मालमत्ता लिलावाची जी कारवाई सुरू केली आहे ती कारवाई म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम एकप्रकारे चालू केले आहे.

परिणामी या कारवाईला विरोध करण्यासाठी येथील बाजार तळ येथे जिल्हा बँक नोटिसांची होळी करत निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी प्रभाकर मापारी, दत्तात्रय पर्वत सुडके, संजय वाबळे, मधुकर वाबळे, नंदकुमार चव्हाण, बाळू ढोमसे, नंदकुमार शिवाजी पानगव्हाणे, जयवंत मापारी, तय्यब शेख, अब्दुल शेख, रामदास गवळी,

भाऊसाहेब ढोमसे, विष्णू पानगव्हाणे, राजाभाऊ आहेर, मोतीराम पाटील, संदीप गणपत पानगव्हाणे, कैलास रामभाऊ पानगव्हाणे, खंडेराव मापारी, दिलीप ढोमसे आदींसह उगाव, शिवडी, वनसगाव, खेडे परिसरातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या या कारवाईविरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकर्‍यांना कळवण्यात येईल, असेही मधुकर ढोमसे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com