
नाशिक । Nashik
मागील वर्षभर करोना संकटाशी दोन हात केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आता महसूल वसूलीकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. २२९ कोटींच्या उदिष्टापैकी ११६ कोटींचा महसूल जमा झाला आहे.
परंतू मार्च अखेरला अवघे दोन महिने उरले असून ६० दिवसात उर्वरीत ११३ कोटींचा महसूल गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला घाम गाळावा लागणार आहे. दरम्यान एकूण महसूलाच्या उदिष्टापैकी ५१ टक्के महसूल गोळा झाला असून सर्वाधिक वसुली १०७ टक्के ही नांदगाव तालुक्याची आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महसूल वसुलीचा आढावा घेत यंत्रणेला टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
२२९ कोटींचे जिल्ह्यास उद्दीष्ट देण्यात आले असताना आजपर्यंत ११६ कोटीच महसूल तिजोरीत जमा झाला आहे. पुढील ६० दिवसात उर्वरीत महसूल वसूल करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत भर घालण्यासाठी आता राज्य शासनाकडून वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात असून तसे आदेश जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी सर्वात कमी २३.२४ टक्के वसूल सुरगाण्या तालुक्याची झाली. तर सर्वाधिक १०७ टक्के वसुली ही नांदगाव तालुक्याने करत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
१५ तालुक्यांपैकी १३ तालुके अद्यापही ५५ टक्क्यांच्या आताच आहे. येवला ७३.८५ टक्के, कळवण ७५.४२ टक्के असून नांदगाव तालुक्याने मात्र सर्वांना मागे टाकत ६१ कोटींच्या तुलनेत ६६ कोटी म्हणजे १०७ टक्के वसूली केली आहे.
करोना संकटाशी दोन हात करण्यात मागील नऊ महिने यंत्रणेचा सर्व वेळ खर्च झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वसुली ५१ टक्केच होऊ शकली.
जिल्ह्याला यंदा २२९ कोटी महसूल वसुलिचे टार्गेट असून त्यापैकी ५१ टक्के म्हणजे ११६ कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. उर्वरीत महसूल वसूल करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
- भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी