सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील भोजापूरसह पाच धरणांत मार्च अखेरपर्यंत साधारणपणे 35 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यात यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवाय भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडणेही शक्य होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर, ठाणगाव, सरदवाडी, कोनांबे, बोरखिंड धरणांत गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला. त्यातल्या त्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत झालेला दमदार पाऊस, दर महिन्याला होणारी अवकाळी पावसाची हजेरी यामुळे धरणातील पाणीसाठा अद्यापही टिकून आहे.

गेल्या अनेक वर्षांत मार्चअखेरपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. मनेगावसह 16 गावे, कणकोरी व 5 गावे, ठाणगावसह पाच गावे, त्याचप्रमाणे बोरखिंड धरणावर आधारित नळ पाणी योजनांकरिता पुरेसा उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. किमान तीन महिने योजना पूर्ण क्षमतेने सुरु राहू शकतील. त्यामुळे यंदा तालुक्याला पाणीटंचाईची भीती नाही, अशी समाधानकारक स्थिती असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

भोजापूरमध्ये 41 टक्के साठा

रब्बी पिकांसाठी पाण्याची मागणी कमी प्रमाणात झाली. त्यामुळे भोजापूरमधून सोडण्यात येणार्या आवर्तनात मागणी अभावी पाणी शिल्लक राहिले. सद्य:स्थितीत भोजापूर धरणात 149 दशलक्ष घनफूट म्हणजेच 41 टक्के पाणीसाठा अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळी आवर्तन देणे शक्य होऊ शकेल. तसे झाल्यास धरणाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तन दिले जाऊ शकेल.