शिवडीत ऑनलाईन सातबारा उतारा वितरण

शिवडीत ऑनलाईन सातबारा उतारा वितरण

निफाड । प्रतिनिधी Niphad

महाराष्ट्र शासन लोकाभिमुख उपक्रमाद्वारे शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचा डिजिटल सातबारा उतारा Digital 7/12 Extract घरपोच वितरण व्हावा या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांच्या वतीने शेतकर्‍यांना त्यांच्या सातबारा उतार्‍याचे घरपोच वितरण मोहिमेचा शुभारंभ शिवडी Shivdi येथे जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

यावेळी जि. प. अध्यक्षांनी शिवडी गावातील सातबारा उतार्‍याचे वितरण केले. तसेच प्रातिनिधिक स्वरुपात सुमारे 50 शेतकरी बांधवांना डिजिटल सहीच्या मोफत सातबाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रानवड व पालखेडच्या मंडल अधिकारी शीतल कुयटे, शिवडी तलाठी पी.एस. फाटकर, खडकमाळेगाव शांताराम क्षीरसागर, नंदू पारधे, संतोष काळे आदींसह विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावात शेतकर्‍यांना ऑनलाईन सातबारा उतारे वाटप सुरू करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांनी ऑनलाईन पीकपेरा नोंदवणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी महसूल विभागाने अ‍ॅपची निर्मिती केली असून शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतात उभे राहून या अ‍ॅपद्वारे पिकाची सातबारा उतार्‍यावर ऑनलाईन नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. आता यापुढे तलाठी आपल्या सातबारा उतार्‍यावर पीकपेरा नोंद करू शकणार नाही. ‘माझी शेती माझा उतारा, मीच लावणार माझा पीकपेरा’ याप्रमाणे शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने पीकपेरा लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील तलाठ्यांनी केल्याने तालुक्यातील शेतकरी आता या अ‍ॅपद्वारे पीक नोंदणी करताना दिसत आहेत.

शेतकर्‍यांनी सातबारा तपासून घ्यावा

सुधारित सातबारा करण्यामागे महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांनी मेहनत घेतली आहे. सुधारित सातबार्‍यावर कुठेही त्रुटी राहणार याची खबरदारी घेतली आहे. तरीदेखील शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला तलाठी यांचेमार्फत मोफत सातबारा उतारा मिळाल्यानंतर तो तपासून घ्यावा व काही त्रुटी असल्यास तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

शीतल कुयटे, मंडल अधिकारी (रानवड)

सुधारित डिजिटल सातबारा अतिशय सुटसुटीत व सर्वसामान्य शेतकर्‍यांना समजेल असा आहे. सुधारित उतार्‍यात होणारे फेरबदल यांचीही माहिती वेळोवेळी मोबाईलद्वारे शेतकरी बघू शकणार असल्याने त्यात वेळदेखील वाचणार आहे. तालुक्यातील आधुनिक पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी सुधारित ऑनलाईन सातबारा उतारा वरदानच ठरणार आहे.

बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. अध्यक्ष

Related Stories

No stories found.