खेळात सातत्य राखल्यास यश शक्य

खेळात सातत्य राखल्यास यश शक्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

क्रीडा संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने (Krida Sanskruti Foundation) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) विविध जिल्ह्यातील 60 क्रीडा संघटक, प्रशिक्षक यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले....

या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून 2004 च्या ऑलिम्पिकमध्ये सेल्लिंग या खेळ प्रकारात भारतातर्फे सहभागी झालेले ऑलिम्पियन खेळाडू मालव श्रॉफ (Malav Shroff), जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik), मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक नानासाहेब महाले, क्रीडा संघटक तथा जपानमध्ये पार पडलेल्या 32 व्या ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे निरीक्षक म्हणून भूमिका पार पाडलेले अशोक दुधारे,

जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, क्रीडा संघटक आनंद खरे,ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार आदींच्या हस्ते या क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी मालव श्रॉफ म्हणाले की, कोणत्याही खेळात सातत्य राखून मेहनत केल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि थेट ऑलिम्पिकपर्यंत जाणे शक्य आहे. हे आताच्याच टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून सिद्ध केले आहे.

त्यामुळे खेळाडूंनी आणि त्यांना घडवणार्‍या प्रशिक्षकानी योग्य प्रकारे योजना आखून त्याप्रमाणे काम करावे.याचे नियोजन करतांना आमच्यासारख्या खेळाडू, संघटकांकडून आपल्याला नेहमीच मदत आणि सहकार्य मिळेल असेही सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक म्हणाले की या पुरस्कारामुळे क्रीडा संघटक, प्रशिक्षक यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष मैदानात जाऊन खेळाडूंच्या प्रगतीसाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या ऑलीम्पिकमध्ये भारतातर्फे निरीक्षक म्हणून सहभागी झालेले क्रीडा संघटक अशोक दुधारे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरवातीला 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाबद्दल आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या सुवर्णकाळाबद्दल आनंद खरे यांनी माहिती दिली. यावेळी या क्रीडा पुरस्कारार्थीच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दलची माहिती छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अस्मिता मोगल आणि सौ विजया दुधारे यांनी दिली. सूत्रसंचलन क्रीडा संस्कृतीचे सचिव उदय खरे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com