गरजू कुटुंबांना मोफत भाजीपाला

करोनाकाळात शेलार, कुंदे यांचा उपक्रम
गरजू कुटुंबांना मोफत भाजीपाला

निफाड । प्रतिनिधी

सध्या करोनामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच बाजारपेठा बंद, आठवडे बाजार बंद यामुळे किराणासह भाजीपाला मिळणे दुरापास्त झाल्याने निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, नगरसेवक अनिल कुंदे यांनी येथील बरड वस्तीवर राहणार्‍या आदिवासी नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करून सामजिक बांधिलकी जोपासली आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्याने त्यावेळीदेखील राजाराम शेलार व अनिल कुंदे यांनी पुढाकार घेत गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, कपडे वाटप केले होते. आतादेखील करोनाने उग्र रूप धारण केले असून सामान्य नागरिकाला जगणे अवघड झाले आहे. निफाड शहरातील सर्वच दुकाने बंद आहेत. हॉटेल, चहा टपरी, कटलरी, किराणा दुकाने, फळ विक्रेते आदींसह सर्वच व्यवसाय बंद आहेत.

अशावेळी गरीब कुटुंबांचा रोजगारासह जीवनावश्यक वस्तू खरेदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा प्रसंगी त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. हीच बाब हेरून राजाराम शेलार, अनिल कुंदे यांनी शेतकर्‍यांकडून भाजीपाला विकत घेत तोच भाजीपाला या गरीब कुटुंबांना मोफत वाटप सुरू केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाची विक्री होऊन गरीब कुटुंबांनादेखील भाजीपाला मोफत घरपोच मिळू लागला आहे. शेलार, कुंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com