करोनायोद्ध्यांना मोफत पीपीई किटचे वाटप
नाशिक

करोनायोद्ध्यांना मोफत पीपीई किटचे वाटप

प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वखर्चातून राबवला उपक्रम

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

चार महिन्यापासून करोनाविरूद्ध लढणार्‍या डॉक्टर, आरोग्य सेवक, अंगणवाडी व आशा सेविका यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे होते. यासाठी शिवसेनेचे देवळाली विधानसभाप्रमुख व नगरसेवक केशव पोरजे यांनी मनपा हद्दीत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने स्वखर्चातून पीपीई किट उपलब्ध करून देत या लढाईत करोनायोद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन नाशिकरोड येथील नोडल अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर यांनी केले.

मनपा प्रभाग २२ मधील वडनेर येथे नगरसेवक केशव पोरजे यांनी आयोजित केलेल्या पीपीई किट वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पश्चिम विभाग नोडल अधिकारी डॉ.चारुदत्त जगताप, करोना केंद्रप्रमुख डॉ.अजिता साळूंखे, वैद्यकीय अधिकारी चैत्राली चौधरी, विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे, अभियंता निलेश साळी, डॉ.विलास वाघ, डॉ.रुपेश संकलेचा, डॉ.असिफ तांबोळी, डॉ.योगेश मुसळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते वडनेर व पिंपळगाव खांब येथे सेवा देणारे खासगी डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सेवक यासोबत घरोघरी जाऊन सेवा देणार्‍या अंगणवाडी व आशा सेविका, तसेच मलेरिया सेवकांना मान्यवरांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.अजिता साळुंखे यांनी सांगितले कि, मनपा क्षेत्रात सातत्याने बाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना आरोग्य सेवा देणेकामी जे करोनायोद्धे आघाडीवर आहेत, अशा सर्वांसाठी पोरजे पुढे सरसावले. त्यामुळे त्यांच्या करोनाविरुद्धच्या लढाईला अधिक बळ मिळाले आहे. प्रास्ताविकातून केशव पोरजे यांनी परिसरातील डॉक्टर, नर्स, अंगणवाडी व आशा सेविका या खर्‍या अर्थाने देवदूत आहेत त्यांच्या सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष हेरून आपण शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे हा उपक्रम राबवित असून या पूर्वी चार महिन्यात ५ हजार कुटूंबांना भाजीपाला, १२०० परिवारास किराणा, मास्क, सॅनिटायझर्स वाटप असे विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन डॉ.असिफ तांबोळी तर आभार विजय कदम यांनी मानले. यशस्वीतेसाठी निलेश कर्डीले, बापू पोरजे, संतोष गडकर, मनोज सातपुते, बबन पोरजे, मधुकर पोरजे, त्र्यंबक पोरजे, अन्सार शेख, सुनील पोरजे आदी प्रयत्नशील होते.

Deshdoot
www.deshdoot.com