१६.३२ लाख क्विंटल अन्नधान्य वाटप
नाशिक

१६.३२ लाख क्विंटल अन्नधान्य वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील ५२ हजार ४३१ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून १ ते १५ जुलैपर्यंत ८४ लाख ३६ हजार ५९६ शिधापत्रिकाधारकांना १६ लाख ३२ हजार ४२० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३१ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे ९ लाख २१ हजार ८०६ क्विंटल गहू, ७ लाख ८ हजार ५२८ क्विंटल तांदूळ, तर ९ हजार ४८५ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे १ लाख ८७ हजार २०२ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो गहू व तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. १५ जुलैपासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण ९ हजार ६५६ रेशनकार्डधारकांला मोफत गहू व तांदूळ वाटप केले आहे.

६ जूनपासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण १ कोटी ३९ लाख ६१ हजार ९१७ रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील ६ कोटी ३१ लाख ४७ हजार ७३ लोकसंख्येला ३१ लाख ५७ हजार ३५० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत १३ लाख ४ हजार ४६ क्विंटल वाटप केले आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणार्‍या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे ३ लाख ७१ हजार १५९ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com