निष्ठावंतांसह जुन्यांना डावलल्याने शिवसेनेत असंतोष

पाच सदस्यीय समिती : घोलप, पांडे यांसह अनेकांना वगळले
निष्ठावंतांसह जुन्यांना डावलल्याने शिवसेनेत असंतोष

नाशिक । कुंदन राजपूत

आगामी महापालिका निवडणुकीत 'रामायण'वर भगवा फडकविण्याची जोरदार तयारी शिवसेनेने केली असून पाच सदस्यीय समितीचि नुकतीच घोषणा केली आहे.

मात्र, या समितीत उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे यांसह जुन्या व निष्ठावंताना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. निष्ठावंतांचे पंख छाटून स्वबळावर सत्तेची तुतारी फुकायची कशी, अश चर्चा दबक्या आवाजात शिवसेनेत सुरु झाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढिल महापौर हा शिवसेनेचाच असेल अशी गर्जना केली असून त्यादृष्टीने नाशिकमध्ये त्यांनी 'जोर बैठका' वाढवल्या आहेत. महापालिका काबिज करण्यासाठी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पाच सदस्यीय समिती गठित केली असून त्यात जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, या समितीवरुन शिवसेनेत छुपी नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्यांनी गल्लीबोळात शिवसेनेचा आवाज बुलंद केला ते उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, नुकतेच सेनेत परतलेले सुनील बागूल, माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, पक्षासाठी विधानसभेला थेट अपक्ष मैदानात उतरत भाजपला आव्हान देणारे नगरसेवक विलास शिंदे यांना वगळण्यात आले.

विशेष म्हणजे गत महापालिका निवडणुकीत ज्यांच्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला, तिकिट वाटपाच्या गोंधळामुळे हाॅटेलात राडा झाला, अशांना समितीत मानाचे स्थान देण्यात आल्याची पक्षात चर्चा आहे. तसेच समितीत ज्यांना स्थान देण्यात आले त्यांच्याविरुध्द सेनेतील अनेकांनी 'मातोश्री' वर उघड तक्रारी केल्या होत्या.

अगदी महापौर निवडणुकीत भाजपला मदत करण्यापासुन ते निष्ठावंतांचे पंख छाटल्याच्या अनेक कारस्थाने वरिष्ठांकडे पोहचले होते. मात्र, समितीत त्यांनाच पुन्हा स्थान देण्यात आल्याने डावलण्यात आलेल्या शिवसेना नेते व त्यांच्या समर्थकांमध्ये छुपी नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशाच पध्दतिने पंख छाटले जात असतील तर निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देयचा कसा, अशी कुजबूज सेनेत ऐकू येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com