निफाड : कोविड केंद्रामुळे मूलभूत आरोग्यसेवांचा बोजवारा

निफाड : कोविड केंद्रामुळे मूलभूत आरोग्यसेवांचा बोजवारा

निफाड । Niphad (प्रतिनिधी) :

करोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार निफाड उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे.

मात्र यामुळे इतर मूलभूत आरोग्यसेवांचा बोजवारा उडाला असून नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

करोना संसर्गाचा तालुक्यात वेगाने प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांनी निफाड येथे कोविड हेल्थ सेंटर स्थापण्याची मागणी केली होती. त्यामुळे शासनाने तत्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले. करोनाचे संकट भयानक असल्याने त्याला प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यामुळे या निर्णयाला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही.

मात्र शासकीय अधिकार्‍यांनी हा निर्णय घाईघाईत घेतल्याने दिसून येत आहे. कारण त्यामुळे अनेक मूलभूत गोष्टींकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी निफाड, चांदवड, येवला या तीन तालुक्यांतून नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येतात.

या ठिकाणी गरोदर माता प्रसूतीसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा, शस्त्रक्रिया, लसीकरण, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, एक्स-रे, सर्पदंश, श्वानदंश, अपघात, गंभीर दुखापती, विषबाधा अशा अनेक गंभीर घटनांमध्ये पीडित रुग्णांवर या ठिकाणी उपचार होत असतात. तसेच या रुग्णालयात दरमहा 70 ते 80 महिलांची प्रसूती होते. येथील प्रयोगशाळेत 200 ते 300 रुग्णांच्या 30 प्रकारच्या विविध चाचण्या मोफत केल्या जातात.

तसेच आय.सी.टी.सी. विभागात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत 300 रुग्णांची मोफत तपासणी होत असून 130 ते 150 रुग्णांना मोफत गोळ्या वाटपाचे काम होत आहे. तसेच महिन्यातून पंधरा ते वीस मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते.

यासह अनेक आजारांवरदेखील येथे उपचार केले जातात. मात्र आता या उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड आरोग्य केंद्रात रूपांतर केल्याने या ठिकाणी गरजू रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच येथे शस्त्रक्रिया करण्यासाठीदेखील अडचणी येत असल्याने रुग्णांना आता नाशिकशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथे कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यापूर्वी ते शहरातच इतर ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते.

मात्र तसे न झाल्यामुळे आता इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे ठरू लागले आहे. तसेच करोना हा धोकादायक रोग असल्यामुळे येथील सेवकांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा व साधने उपलब्ध करून द्यावी.

तसेच ऑक्सिजन, पीपीई किट, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरणाच्या सोयी, स्वच्छता या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व आरोग्य सेवकांचे मनोधैर्य टिकून ठेवण्याकडेही विशेष लक्ष पुरवणे महत्त्वाचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com