
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काँग्रेस (Congress) पक्ष निरीक्षकांसमोरच इगतपुरी तालुक्यातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर हात उचलण्याची मजल विरोधी गटाकडून झाल्याचा प्रकार काँग्रेस भवनात (Congress Bhavan) घडला. या प्रकाराने पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना देखील धक्का बसला आहे. मध्यस्थी करून हा वाद मिटविण्यात आला. मात्र, यातून पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन घडले...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (All India Congress Committee) देशपातळीवर पक्षांतर्गत निवडणुकीचा (Election) कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष येत्या २२ जूनपर्यंत निवडून देणे आवश्यक आहे.
त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार असल्यामुळे शनिवारी (दि.१८) जिल्हा निरीक्षक डॉ. प्रवीणकुमार चंद्रभूषण (Dr. Praveenkumar Chandrabhushan) यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, तालुका अध्यक्षांची बैठक काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत चंद्रभूषण यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे दालनात चर्चा करण्यासाठी पाचारण केले. तालुक्याचा आढावा घेत असताना इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी (Janardhan Mali) यांनी इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) गेल्या काही महिन्यांत तालुकाध्यक्ष बदलाच्या झालेल्या राजकारणाबाबत सांगितले.
त्यावरून वाद होऊन संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांच्या समर्थकाने माळी यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पक्ष निरीक्षकांसमोरच हा प्रकार सुरू असताना या कार्यकर्त्याने थेट माळी यांच्या अंगावर जाण्यास सुरुवात केली.
प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (Rajaram Pangavhane), जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr. Tushar Shewale) यांनी यावेळी मध्यस्थी केली. अखेर त्या कार्यकर्त्याला कार्यालयाबाहेर काढून देण्यात आले. या वादामुळे साऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली.
असा आहे वाद
रामदास धांडे हे इगतपुरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत राजकारण करण्यात होऊन आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे आदींनी प्रदेशाध्यक्षांकडे धांडे यांच्या तक्रारी करून त्यांच्याऐवजी रमेश जाधव यांची तालुकाध्यक्षपदी नेमणूक करून घेतली. त्यावरही तक्रारी झाल्याने पुन्हा धांडे यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून इगतपुरी तालुका काँग्रेस अंतर्गत वाद आहे. संदीप गुळवे यांनी इतर पक्षात जाऊन पुन्हा काँग्रेसचा हात धरला आहे.याचाही रोष पक्षाच्या निष्ठावानांमध्ये आहे.