नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. राज्यातील सत्ताबदला नंतर भाजपच्या काळातील नियुक्त विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले असून, आता नव्याने समित्या व अभ्यासगट नेमले जाणार आहेत.

2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यावर, विनोद तावडे शिक्षणमंत्री झाल्यावर पहिली ते बारावीचा नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना करण्यात आली. 2014 ते 2018 या कालावधीत नव्या विषय समित्या आणि अभ्यास मंडळांची नेमणूक करण्यात आली.

नव्या नेमणुकीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. या नेमणुकांमध्ये भाजपसंबंधित सदस्यांची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेले उद्बोधन वर्ग, पुनर्रचित अभ्यासक्रम यावरून वादही निर्माण झाले होते.

आता बालभारतीकडून संबंधित विषय समिती आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवूले आहे. आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आधीच्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले आहेत. पुढील काही काळात नव्या सदस्यांच्या नेमणुका केल्या जातील.

सर्व विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले असून आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची निर्मिती होणार असल्याने नवीन अभ्यास गट नियुक्त केले जातील, अशी माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.