नांदूरमध्यमेश्वर धरणातून १४ हजार क्युसेसचा विसर्ग
नाशिक

नांदूरमध्यमेश्वर धरणातून १४ हजार क्युसेसचा विसर्ग

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

संपूर्ण जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावणे सुरुच ठेवल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या बाजूकडील ५ गेटमधून १४ हजार क्युसेसचा विसर्ग करण्यात येत आहे.

तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असून शनिवारी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सदर पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात येताच या धरणातून १६ हजार क्युसेसचा विसर्ग करण्यात येत होता.

रविवारी दुपारनंतर मात्र नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग २ हजार क्युसेसने कमी करण्यात आला असून रविवारी दुपारी ३ वाजेनंतर धरणाच्या ५ गेटमधून १४ हजार क्युसेसचा विसर्ग करण्यात येत होता.

दरम्यान नांदूरमध्यमेश्वर धरणातून सतत सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जायकवाडी धरण ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून यावर्षी जिल्ह्यातून जायकवाडी धरणात ९ टीएमसी पाणी पोहचले आहे.

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ परिसरात काल दिवसभर पावसाची हजेरी सुरुच राहिल्याने सर्वत्र दलदलीचे साम्राज्य तयार झाले असून पावसामुळे शेतीमशागतीच्या कामांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. दरम्यान मंगळवार दि.१८ रोजी श्रावण महिना संपत असून त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com