नदीपात्रातील पानवेलींमुळे दुर्गंधी

गेट टेस्टिंगच्या नावाखाली पानवेली काढल्याने ग्रामस्थांचा संताप
नदीपात्रातील पानवेलींमुळे दुर्गंधी

निफाड । प्रतिनिधी Niphad

नांदूरमध्यमेश्वर धरणात ( Nandurmadhyameshwar Dam) साठलेल्या पानवेली( Weeds ) काढून देण्यासाठी धरणाच्या गेट टेस्टिंगचे कारण देत 5 गेटमधून तब्बल 3 हजार क्युसेसचा विसर्ग केल्याने धरणातील पानवेली पाण्याबरोबर वाहत येत या पानवेलींनी आता नांदूरमध्यमेश्वर, तारूखेडले, तामसवाडी, सारोळेथडी, करंजी, झुंगे, खेडलेझुंगेपर्यंतच्या नदीपात्रात बस्तान मांडल्याने या पानवेलींची दुर्गंधी ( Dirty Smell ) पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सद्यस्थितीत नदीपात्रात पाण्याऐवजी पानवेलींचे साम्राज्य दिसून येत असून या पानवेली काढण्याची मोहीम पाटबंधारे विभागाने राबविण्याची मागणी होत आहे. चांदोरी, सायखेडा, करंजगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली साठल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी नदीपात्रातील पानवेली काढण्याची मागणी लावून धरली होती. परिणामी पाटबंधारे विभागाने पानवेली काढण्याची मोहीम हाती घेतली होती.

मात्र विस्तीर्ण नदीपात्रातील या पानवेली काढण्यास कित्येक महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने व या पानवेलीचे प्रस्थ वाढतच असल्याने पाटबंधारे विभागाने अखेर धरणाच्या गेटच्या टेस्टिंगच्या नावाखाली धरणाचे 8 पैकी 5 दरवाजे अर्धा मीटर उचलून धरणातील पाणी नदीपात्रात काढून दिले. साहजिकच या पाण्याबरोबर धरणातील पानवेलीदेखील खाली नदीपात्रात वाहत आल्या.

नांदूरमध्यमेश्वरपासून ते तारुखेडले, तामसवाडी, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळदपर्यंतच्या नदीपात्रात पानवेलींनी आपले बस्तान बसविले आहे. साहजिकच करंजगाव, चापडगावसह धरणातील पानवेलींची संख्या कमी होवून या पानवेली धरणाखालील नदीपात्रात आल्याने हे संपूर्ण नदीपात्र पानवेलींनी झाकले गेले असून या पानवेलींची दुर्गंधी परिसरातील गावात फैलावून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाचे मते दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गेटची टेस्टिंग घेतली जाते. तर मग उर्वरित तीन गेटची टेस्टिंग का घेतली नाही. तसेच मागील वर्षीदेखील अशी टेस्टिंग घेतली गेली नाही. साहजिकच केवळ धरणातील पानवेली काढून देण्यासाठी तर हे गेट उघडले नव्हते ना, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

डासांचे प्रमाण वाढले

नांदूरमध्यमेश्वरपासून ते खेडलेझुंगेपर्यंतच्या नदीपात्राला पानवेलींचा विळखा पडला असून या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने या नदीपात्रातील पानवेली तत्काळ काढाव्यात अन्यथा परिसरातील गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याबाबत आंदोलन छेडण्यात येईल.

शांताराम दाते, माजी सरपंच (नांदूरमध्यमेश्वर)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com