दिंडोरीनामा: मोहाडी गटाचा बाहुबली कोण?

दिंडोरीनामा: मोहाडी गटाचा बाहुबली कोण?

दिंडोरी | संदीप गुंजाळ Dindori

भाजपला (bjp) सोडचिठ्ठी देत तुकाराम जोंधळे (Tukaram Jondhale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) सर्वेसर्वा खा. शरद पवार (mp Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Zilha Parishad elections) पार्श्वभूमीवर झालेली ही एन्ट्री चर्चेचा विषय झाला असून कोण होणार मोहाडी (mohadi) गटाचा बाहूबली? नाना की भाऊ ? यावर गप्पा रंगल्या असून मोहाडी गटात आरक्षण (Reservations) कोणतेही निघाले तरी चर्चा नाना आणि भाऊचीच होणार हे नक्की झाले आहे. त्याचबरोबर दादा भाऊला पाठिंबा देतील की स्वतः भाऊच्या मदतीने आपले नशीब आजमावतील अशा गप्पांना सुरुवात झाली असून निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर गुलाबी थंडीत (cold) गरमागरम गप्पा ऐकायला मिळत आहे.

मोहाडी गटाचे नाव घेतले तरी प्रविणनाना जाधव हे नाव पुढे येते. अर्थातच मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी या गटावर आपला वर्चस्व प्रस्थापित करून कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय निर्माण केल्यामुळे सध्यातरी मोहाडी गटाचा बाहुबली म्हणून प्रविणनाना जाधव यांचे नाव पुढे येते. दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी मोहाडी गटावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. परंतु सध्या त्यांना आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीत बदल करायचाच असा चंग बांधला असून यात ते कितपत यशस्वी होणार ही येणारी वेळच सांगु शकेल.

प्रविणनाना जाधव यांना शह देण्यासाठी एकेकाळी प्रविणनानांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तुकाराम जोंधळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खेचत एक कडवे आव्हान उभे केले हे मात्र निश्चित. मागील जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीवेळी शिवसेनेकडून (shiv sena) आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी न मिळाल्याने नाराज होवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यात क्रमांक दोनची मते मिळवित त्यांनी तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. पराभव होऊनही त्या लढतीची चर्चा तालुकाभर होती.

पराभवाने न खचता गटातील प्रत्येक गावात आपला संपर्क वाढवून तुकाराम जोंधळे यांनी आपले वयक्तिक वलय निर्माण केले. परंतु भाजपमध्ये काम करतांना काही संकुचित बुध्दीच्या कर्तृत्वशुन्य स्वयंघोषित नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपला रामराम केला.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला मोहाडी गटावर प्रविणनानांचे वर्चस्व कमी करून सत्ता बदल करायचे असल्याने त्यांनी तुकाराम जोंधळे सारखा सर्वसमावेशक नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावे यासाठी प्रयत्न केले.

राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच तुकाराम जोंधळे यांनी स्वगृही अर्थात शिवसेनेत परत यावे अशी इच्छाही शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली परंतु जिल्हा परिषद निवडणूकीचे ध्येय समोर ठेवून काम करणार्‍या तुकाराम जोंधळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल याची खात्री धुसरच होती. दोन पंचवार्षिक निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करून बाहुबली म्हणून मोहाडी गटात प्रस्थापित असलेले प्रविणनाना जाधव यांना डावलून तुकाराम जोंधळे यांना उमेदवारी देणे पक्षाला न परवडणारे असेल हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे पुन्हा डावलण्यासाठी शिवसेनेत प्रवेश न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे त्यांनी उचित समजले व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी एकप्रकारे जिल्हा परिषदेचे रणशिंग फुंकले असे वाटते.

आरक्षण काहीही निघू द्या पण प्रतिष्ठा मात्र नाना आणि भाऊचीच पणाला लागणार हे आजचं निश्चित झाले आहे. मागील दहा वर्षात मोहाडी गटात आपल्या विकासकामांचा धडाका लावून विकासपुरुष म्हणून संबोधले जाणारे प्रविणनानांचा पक्षविरहित गोतावळा तसा दांडगाच आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होवून कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यात प्रविणनाना या़ंचा दांडगा अनुभव. त्यांच्या सानिध्यातच तयार झालेले तुकाराम जोंधळे हे देखील त्याच दिशेने वाटचाल करीत असले तरीही यश कोणाला मिळणार हे बघणं महत्त्वाच ठरेल.

मोहाडीचे दुसरे नेतृत्व शहाजीदादा सोमवंशी हे देखील जि. प. चे उमेदवारी तोलवू शकतात. मोहाडी सारख्या ठिकाणी मतदानाची विभागणी करतांना स्थानिक ठिकाणी पक्षाचा उमेदवार न ठेवता मतदारांचा पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा घेण्यात यशस्वी होतील का? हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोहाडी गटातील ग्रामपंचायतीत पालखेड बंधारा, खडकसुकेणे, आंबे-दिंडोरी येथे सत्तापालट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेलाही गटात बदल करण्याचे मनसुबे रचले असले तरी येणारी निवडणुकीत सर्व काही स्पष्ट होणार आहे.

मोहाडी गटातील महत्वाचे गावे म्हणजे जानोरी आणि पालखेड बंधारा या दोन्ही गावात पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली जाते. यावेळीही दोन्ही प्रमुख पक्ष अर्थात राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी लढण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली आहे . त्यामुळे या गावात पंचायत समितीसाठी प्रमुख पक्षांची उमेदवारी असणार हे देखील स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत येणार्‍या आरक्षणाच्या भाकीतावरून निवडणुकीच्या तयारीला इच्छुक उमेदवार तयारीला लागले असले तरीही मोहाडी गटाचा बाहुबली कोण ठरणार? नाना की भाऊ? ऐनवेळी दादांची तर एन्ट्री होणार नाही ना? अशा चर्चांना उधाण आले असले तरी येणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे आजचं स्पष्ट झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com