दिंडोरी । Dindori

दिंडोरी नगरपंचायतीसाठी शिवसेनेने व्युहरचना सुरु केली असून शिवसेना तालुकाप्रमुख सतिश देशमुख, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले यांचे गट बंधन अधिक भक्कम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केले आहे.

मागील वेळी हातातून गेेल्याचे शल्य शिवसैनिकांच्या मनात असल्याने यावेळी एक हाती सत्ता आणण्यासाठी सर्व शिवसेना नेते व कार्यकर्ते प्रयत्न करत आहे.

दिंडोरी शहरात शिवसेनेची ताकद आहे. परंतू मागील वेळी शिवसेनेतील अंतर्गत नियोजन कोलमडल्याने वातावरण असूनही शिवसेना-भाजपला सत्तेपासून दुर होण्याची वेळ आली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपंचायतीची सत्ता गेली. त्यानंतर विधानसभा निवडणूकीतही राष्ट्रवादीला प्रचंड आघाडी मिळाली. शिवसेना पिछाडीवर गेली.

प्रांत वादाचा फटका कळत न कळत शिवसेनेला बसला. परंतु आता नगरपंचायत निवडणूक जवळ आल्याने शिवसेना इच्छुकांना शिवसेनेची ताकद एकत्र करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

विधानसभा निवडणूकीपूर्वी रामदास चारोस्कर शिवसेनेत आल्याने शिवसेनेला दिंडोरी शहरात फायदा होणार आहे. त्यामुळेच शिवसेना आतापासूनच तयारीला लागली आहे. परंतू शिवसेना तालुकाप्रमुख सतिश देशमुख, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह जुन्या व नव्यां नेत्यांची ताकद शहरात गटातटात दुभंगलेली दिसत आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या डावपेचाला कुणीही नेते बळी पडू नये, यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहे. सत्तेपासून दुर रहावे लागल्याने फार मोठी किंमत अनेक नेत्यांना राजकीय जीवनात चुकवावी लागत आहे.

त्यामुळे यापुर्वी काळात शिवसेनेची सत्ता दिंडोरी नगरपंचायतीत यावी, यासाठी सतिश देशमुख, रामदास चारोस्कर, धनराज महाले यांच्यातील अंतर कमी करुन सर्व जुन्या आणि नव्या निष्ठावान शिवसैनिकांना बरोबर घेऊन गट बांधण्याचा प्रयत्न शिवसेना नेते करीत आहे.