दिंडोरी- देहरेवाडी प्रकरण : फिर्यादी वडीलच निघाला आरोपी

दिंडोरी- देहरेवाडी प्रकरण : फिर्यादी वडीलच निघाला आरोपी

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी - देहरेवाडी Dindori- Dehrewadi शिवारातील जंगलात दहा वर्षीय मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न गुराख्यामुळे फसला होता. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असतांना बापाने आपल्या मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद दिली

.मात्र दिंडोरी पोलिसांनी काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावत फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न केले असून जन्मदात्या पित्यानेच आपल्या चिमुकलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले असून दिंडोरी पोलिसांनी Dindori Police Station मुंगसरे Mungsare येथील क्रूरकर्मा रामु धनगरे यास अटक केली आहे. मुलगी काम करत नाही भांडण करते शिव्या देते या कारणावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब पुढे आली आहे.

शुक्रवार 7 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास देहरेवाडी जंगलात Dehrewadi Forest येथील गुराखी आपले नेहमीप्रमाणे जनावरे चारीत असताना जंगलात काही तरी आवाज व झटापट होत असल्याची जाणीव झाली. त्याने जंगली जनावरे असावे, असा अंदाज करुन त्या दिशेने पाहणी केली असता एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले. गुराख्याने त्या इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला असता दाट झाडे झुडपांचा फायदा घेत तो फरार झाला. गुराख्याने त्या मुलीला तत्काळ खाली उतरवून याबाबतची माहिती रवळगाव चे पोलीस पाटील साहेबराव साळवी यांना देण्यात आली व त्यांनी याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला खबर दिली सदर मुलीस ग्रामस्थांनी अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दिंडोरी पोलिसांना ही बाब समजताच अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु करून पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांनी तपासाची चक्रे फिरवली.मुंगसरे येथील रामू धनगरे याने गावातील व्हॉट्स अप गृपवर मुलीचा फोटो बातमी आल्याचे समजताच पोलीस ठाण्यात तसेच नाशिक जिल्हा रुग्णालयात येत सदर मुलगी आपलीच असल्याचे सांगत तिला कुणीतरी पळवून नेत मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली मात्र बापानेच हे कृत्य केले असावे असा संशय पोलिसांना आला त्यांनी त्यास गाफील ठेवत तपास सुरू केला दरम्यान शनिवारी सकाळी बेशुद्ध असलेली मुलगी शुध्दीवर आली व तिने आपल्या बापाने मोटरसाकलवरून दरी कडील जंगलाकडे नेत तेथे मारहाण केली व दोरीने गळा आवळला त्यानंतर आपण बेशुद्ध झाल्याचं जबाब दिला.

पोलिसांनीही रामू स पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रतिक्षा ही रोज भांडण करते, कामाला जात नाही तसेच मोठ्या बहिणीबरोबर वाद घालते तसेच मलाही शिव्या देत असल्याचा राग येवून मुलगी प्रतिक्षा हिस जंगलात नेवून तिला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केल्याचे संशयित रामु धनगरे याने कबूल केले. रामू हा मूळ रां.ओझरखेड ता.त्रांबकेश्र्वर सध्या मजुरी साठी मुंगसरे येथे भाड्याने खोली घेवून राहत होता त्याची पत्नी ही त्याचे सोबत राहत नव्हती मात्र त्याचे तीन मुले व तो दुसरी महिला व तिच्या दोन मुलांसमवेत राहत होता .

किरकोळ कारणावरून तो पोटच्या मुलीच्या जीवावर उठला मात्र मुलीचे नशीब बलवत्तर म्हणून गुराख्याच्या प्रसंगावधानामुळे हा प्रयत्न फसत सदर बालिका बचावली आहे. सदर मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच रामु धनगरे हा तेथे हजर झाला. दिंडोरी पोलीस ठाण्यात वडील रामु धनगरे याच्याविरूध्द मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे व दिंडोरी पोलिसांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com