
नांदूरशिंगोटे । भानुदास वैष्णव Nandurshingote
येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे (Grampanchayat Elections )वातावरण तापले असून चौकाचौकांत, हॉटेल इत्यादी ठिकाणांसह कट्ट्यांवर गप्पांचे फड रंगू लागले आहेत. उमेदवारांकडून प्रचारासाठी डिजिटल यंत्रणेचा उपयोग केला जात असल्याने विधानसभा किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फिल येत आहे.
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकनियुक्त सरपंचपदासाठी ग्रामविकास पॅनलच्या लंकावती सानप, जनसेवा विकास पॅनलच्या शोभा बरके तर अपक्ष उमेदवार अनिता शेळके अशी तिरंगी लढत रंगणार आहे. ग्रामविकास पॅनलच्या सानप यांची प्रचार यंत्रणा आघाडीवर असली तरी जनसेवाच्या बरके, अपक्ष उमेदवार शेळके यांची प्रचार यंत्रणाही जोर धरू लागली आहे.
गावातील मुख्य बाजारपेठ, महामार्गालगत, महत्त्वाच्या जागा, चौकाचौकांत प्रचाराचे होर्डिंग्ज, बॅनर झळकत आहेत. चित्ररथ व ध्वनिक्षेपकावरून होत असलेला प्रचार विधानसभा किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसारखाच होताना दिसत आहे. यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणेने जोर धरला असून ऑडिओ, व्हिडिओ क्लिप, वचननामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्ते घराघरांत पोहोचून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामदैवत श्री रेणुका माता मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराची धुरा बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव शेळके, माजी चेअरमन शंकरराव शेळके, माजी चेअरमन भाऊ पाटील शेळके, शिवसेनेचे नाना शेळके, विलासराव सानप, रामदास शेळके, एकनाथ शेळके, रामनाथ शेळके, बाळासाहेब वाक्चौरे, माजी सरपंच अशोक गवारे, आदिवासी ठाकर समाजाचे जिल्हा युवा नेते तुकाराम मेंगाळ, चेअरमन दत्ताजी मुंगसे, बाबासाहेब वर्पे, संतोष कुचेकर हे सांभाळत आहेत.
तर जनसेवा विकास पॅनलची धुरा ज्येष्ठ नेते पी. डी. सानप, विनायक शेळके, आनंद शेळके, दीपक बरके, नानासाहेब शेळके, शशिकांत येरेकर, संचित शेळके, रामदास शेळके, दत्ताजी सानप सांभाळत आहेत. अपक्ष उमेदवार अनिता शेळके यांच्या प्रचाराची धुरा अरुण शेळके, संतोष सानप, दत्तू शेळके, राजेंद्र शेळके, वैभव नवले, किरण शेळके, चंद्रभान पठारे यांनी खांद्यावर घेतली आहे.