
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आजच्या तरुण पिढीला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. समाज आणि कायदा यांचे अतूट असे नाते आहे. यासाठी तरुणपिढीने कायद्याचा अभ्यास करावा, गुन्हा दाखल झाला म्हणजे सर्व सोपास्कार पूर्ण झाले असे होत नाही. गुन्हा दाखल होणे अन् तो सिध्द होणे, यात मोठा फरक असल्याची माहिती न्यायाधीश शर्वरी जोशी यांनी दिली.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त महिला सुरक्षा विषयक व अॅटी रॅगिंग कायद्याविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्यायाधिश शर्वरी जोशी बोलत होत्या. व्यासपीठावर न्यायाधिश बी. एम. गिते, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदाम गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, डॉ. स्वाती सिंग आदी होते.
न्यायाधिश शर्वरी जोशी पुढे म्हणाल्या की, स्वयंम सुरक्षा करण्यासाठी पंचसूत्री आवश्यक आहे. यामध्ये जागरुक राहणे, प्रवासादरम्यान आवश्यक अॅप स्वसुरक्षा प्रशिक्षण स्वताभोवती लक्ष्मणरेषा आखून घ्यायला हवी, तसेच परिस्थितीप्रमाणे निर्णय क्षमता हवी. ही सूत्रे कायम लक्षात ठेवायला हवी. न्यायाधिश बी. एम. गिते यांनी यावेळी सांगितले की, अॅटी रॅगिंग हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. रॅगिंग केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड तसेच पुढील पाच वर्ष कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नाही.
प्रास्ताविक भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, विद्यार्थ्यानी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना आपल्या विषयी काही छेडछाडीचे प्रकार घडत असेल तर याविषयी तातडीने शिक्षकांना माहिती द्यायला हवी, त्यामुळे वेळीच कारवाई करणे शक्य होऊन परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल असे सांगीतले.
याप्रसंगी अॅड. प्रकाश गायकर, अॅड. संजय मुठाळ, अॅड. शामराव हांडगे, अॅड. रामदास आहेर, अॅड. प्रमोद कासार, अॅड. सुनित शितोळे, अॅड. आरणे, संजय धमके, सुनील बागुल, शाम जाधव, सविता आहेर, विजय गायकवाड, एस. डब्ल्यु पवार, श्वेता श्रीमाळी, जयश्री जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचलन श्रध्दा राविकर व आभार उपपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी मानले.