पिंपळगाव बसवंत । Pimpalgoan

पिंपळगाव शहरात अलीकडे रात्रीच्यावेळी ट्रक, टेम्पो या वाहनातील डिझेल चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

मागील तीन विविध घटनांमध्ये चोरट्यांनी वीस ते बावीस हजार रुपयांचे डिझेल चोरी केल्याचे वाहन मालक, चालकांच्या लक्षात आले. त्यामुळे इंधन चोरीचे रॅकेट पिंपळगाव शहरात सक्रिय झाल्याची शक्यता आहे.

पिंपळगाव एसटी बस डेपोलगत मालवाहतूक करणारे अनेक वाहने दिवसभर भाडे वाहतूक करून बहुतांश टेम्पोचालक घरासमोर वाहन पार्किंगला जागा नसल्याने टेम्पो स्डंडवरच टेम्पो पार्किंग करतात. चोरट्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत गेल्या आठ दिवसांत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीस ते बावीस हजार रुपयांचे डिझेल चोरल्याचे उघडकीस आले आहे .

एमएच १९ झेड २४०७ किशोर घोंगाणे यांच्या आयशरमधून दिवसांपूर्वी चोरट्यांनी एकशे वीस लिटर डिझेल काढून घेतले. मध्यरात्री एमएच ०४, सीजी जमील अक्तार यांच्या आयशर टेम्पो मधून ऐशी लिटर, तर एमएच ०१, जी ७२३९ राजू घायाळ यांच्या टेम्पोमधून २० लिटर असे आठ दिवसांत एकूण वीस ते बावीस हजार रुपयांचे डिझेल चोरीला गेले आहे.

विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. यापरिसरातील टेम्पो स्टैंड जवळील पालिकेचा सीसीटीव्ही कॅमेरा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे चोरट्यांचे अधिक फावले.

या संधीचा फायदा इंधन चोरट्यांनी घेतला असून, चोरीचे रॅकेट पिंपळगाव शहरात सक्रिय झाल्याने वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात पोलिसांनी अधिक दक्ष राहून गस्त वाढविण्याची गरज असल्याचे माजी सरपंच महेंद्र गांगुर्डे यांनी सांगितले.