देवनदी, शिवनदी खळखळू लागली
नाशिक

देवनदी, शिवनदी खळखळू लागली

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसानेही तालुक्याने दिलासा दिला असून तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या देवनदीवरील कोनांबे धरण पाण्याने काठोकाठ भरल्याने ही नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच वाहून लागली आहे. शहराजवळील सरदवाडी धरणही भरल्याने शिवनदीदेखील वाहू लागली आहे.

तालुक्यातील औंढेवाडी-धोंडबार, कोनांबे तालुक्याचे कोकण म्हणून प्रसिध्द आहे. मात्र, या कोकणावर पावसाची माया म्हणावी असी बरसलीच नाही. त्यामुळे कोनांबे धरण भरायलाही यंदा वेळ लागला. पावसाळ्याचे दोन महिने होऊन गेल्यानंतर हे धरण भरले असून देवनदी वाहती झाली आहे. गेल्यावर्षी जुलै महिना संपण्यापूर्वीच हे धरण भरले होते. उशीरा का असेना देवनदी वाहू लागली असून गुरुवारी (दि.13) रात्रीच पाणी सोनांबेच्या पुढे गेले होते.

शहरालगत असणार्‍या सरदवाडी धरणालाही जामगाव पास्तेसह परिसरातील कोकणच तारत असते. या भागातही यंदा उशीराच पाऊस पडला. त्यामुळे सरदवाडी धरण भरायलाही उशीरच झाला. हे धरण भरल्याने शिवनदी वाहती झाली असून शिवनदी व शिवनदीच्या कुंदेवाडी येथील संगमावर एक-दोन दिवसा पाणी पोहचण्याची शक्यता आहे. संगमानंतर देवनदी तालुक्याच्या पूर्व भागाकडे झेपावते.

त्यामुळे देवनदीला येणार्‍या पूराकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. देवनदीवर 20 ब्रिटीशकालीन बंधारे असून या 20 बंधार्‍यांवर 20 गावांची शेती फुलत असते. टप्प्या-टप्प्यात देवनदी पूढे सरकेल तसे या बंधार्‍यांवरील पाटचार्‍याही वाहू लागतील. त्यातून या 20 गावांमध्ये शेती समृध्द होण्याबरोबरच गाव परिसरातील विहिरींना पाणी देखील उतरेल. त्यामुळे या 20 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास हातभार लागले. रब्बी हंगामाची काही अंशी चिंताही मिटेल.

कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, देवपूर, किर्तांगळी, वडांगळी, चोंढी, मेंढी, सोमठाणे मार्गे देवनदी सांगवी येथे गोदावरील जाऊन मिळते. त्यामुळे देवनदीला येणारं पाणी तालुक्यातील अनेक गावांना समृध्द करुन जात असते. देवनदी वाहती झाल्याने या सर्वच गावांमधील रहिवाशांचा उत्साह वाढला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com