विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी भाविक सज्ज

विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी भाविक सज्ज

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाचे ( Corona )संक्रमण नियंत्रणात असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. या भितीयुक्त सावटात लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांचे भाविक, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत सार्वजनिक मंडळांतर्फे श्रीमुर्तींची ( Shri Ganesh Idols )प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

विघ्नहर्त्या गणरायांचा यंदा 10 दिवसांचा मुक्काम तसेच चांगली पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे भाविकांचा उत्साह वाढला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी श्रीमुर्ती घेण्यासह पुजाविधी व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांनी आज बाजारपेठेत एकच गर्दी केली होती ( crowd in market). करोना लॉकडाऊनमुळे यंदा श्रीमुर्तींसह सजावट व पुजेच्या साहित्यात 15 ते 20 टक्के दरवाढ झाल्याचा फटका भाविकांना सहन करावा लागत होता.

गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival )पार्श्वभूमीवर शासनातर्फे करोना संक्रमण वाढू नये यास्तव विविध नियम लागू करण्यात आले आहे. उत्सव शांततेत पार पडावा या दृष्टीकोनातून पोलीस-प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात संवेदनशील भागासह ठिकठिकाणी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. शांततेस गालबोट लावण्याचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करत सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत विजयानंद शर्मा यांनी केले आहे.

गत आठवडाभरापासून शहरात ठाण मांडून असलेल्या पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. श्री स्थापना व विसर्जन मिरवणूक मार्गाची दुरूस्ती करण्याचे काम मनपातर्फे हाती घेण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडीत होवू नये या दृष्टीकोनातून वीज वितरणतर्फे नियोजन केले जात आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीसह सुरळीत पाणीपुरवठा व्हावा व संपुर्ण शहरात स्वच्छता राहावी या दृष्टीकोनातून मनपा यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली.

गणेशोत्सवास आज शुक्रवार (दि. 10) पासून प्रारंभ होत असल्याने विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यास भाविक सज्ज झाले आहेत. घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे श्रीमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याने प्रतिष्ठापना मंडप सजावटीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. करोना सावटाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करत मंडळांतर्फे श्रीमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मुर्तीची उंची जास्त राहणार नाही याची दक्षता देखील यंदा मंडळांनी घेतली आहे.

गणरायांच्या मुर्ती घेण्यासह पुजा व सजावटीचे साहित्य घेण्यासाठी आज बाजारपेठेत भाविकांची एकच गर्दी झाली होती. मोसमपूल, जुना आग्रारोड, सटाणानाका, सरदार चौक, संगमेश्वर, कॅम्परोड, रावळगावनाका आदी भागात श्रीमुर्ती विक्रीचे दुकाने लावण्यात आली होती. प्लॅस्टीक व थर्माकोलवर बंदी असल्याने कागदी फुलांच्या माळा, मोत्यांचे हार व तसेच कापडी मखर, लाकडी सिंहासन, हार, मुकूट आदी सजावटीचे साहित्याची खरेदी केली गेली.

शाडू मातीच्या ( Shadu Soil ) मुर्तींना मागणी

प्रदुषण टाळण्यासाठी पर्यावरणपुरक असलेल्या शाडू मातीने निर्मित श्रीमुर्तींची खरेदी करण्याकडे भाविकांचा यंदा मोठा कल दिसून आला. विविध शाळांमध्ये ऑनलाईन शाडू मातीच्या मुर्ती निर्मितीच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आवडीमुळे देखील शाडू मातीच्या मुर्तींची मागणी वाढली आहे. सटाणारोड, कॅम्प, संगमेश्वर आदी भागात शाडू मातीच्या मुर्तींचे दुकान थाटण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com