
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwer
आज श्रावणातील (Shravan) शेवटचा सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवार (दि.१०) रोजी रात्रीच्या सुमारास हजारो भाविक राज्यासह देशभरातून त्र्यंबकनगरीत दाखल झाल्याने मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. त्यानंतर आज सकाळपासून मंदिर खुले करण्यात आल्यावर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
यावेळी भाविकांनी कुशावर्त कुंडावर जाऊन स्नान करत त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन ब्रह्मगिरी (Bramhgiri) फेरीची सुरुवात केल्याचे दिसून आले. तर श्रावणातील पहिल्या सोमवारी (First Monday of Shravan) त्र्यंबकेश्वरला भाविकांची कमी प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी थोडी गर्दी वाढल्याचे पाहायला मिळाले होते. तर तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखो भाविक (Devotee) त्र्यंबकनगरीत दाखल झाले होते. त्यानंतर आज चौथ्या श्रावण सोमवारी देखील हजारो भाविक दाखल झाल्याने त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेल्याचे चित्र आहे.
दरम्यान, काल सकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी नाशिकहून येणारी रामवारी दिंडी हरिहर भेटीसाठी दाखल झाली होती. त्यामुळे त्र्यंबक शहरात आणखी गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर सायंकाळी चौथ्या व शेवटच्या श्रावणी सोमवारच्या (Shravani Somwar) निमित्ताने त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. तर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर आणि मेनरोडवर गर्दीमुळे पायी चालणेही कठीण झाले होते. तसेच त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी देणगी दर्शनाची रांग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत लागली होती. यानंतर आज सकाळपासून चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे.