
कळवण । प्रतिनिधी Kalwan
श्रीक्षेत्र सप्तशृंगगड ( Saptshrungi Gad ) येथे नवरात्रोत्सवात ( Navratri Festival-2022 ) सहाव्या दिवशी हजारो भाविकांंनी भक्तिमय वातावरण, जयघोषात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी सपत्नीक केली. याप्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, धर्मादाय सहआयुक्त तुफानसिंग अकाली, जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ आदी प्रत्यक्ष पूजेत सहभागी झाले.
सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 7 वाजता देवीची महापूजा करण्यात आली.
याप्रसंगी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहा. पोलीस अधीक्षक खांडवी, विश्वस्त व तहसीलदार बंडू कापसे, विश्वस्त दीपक पाटोदकर, एन. डी. गावित, माजी मंत्री आनंदराव आडसूळ यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे 12 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.