
नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
तालुक्यातील जातेगाव (Jategaon) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात (Pinakeshwar Mahadev Temple) श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची (Devotees) गर्दी होत असते. मात्र, येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्टतर्फे वाहनतळाच्या नावाखाली भाविकांकडून अनधिकृतपणे लूट करण्यात येत असल्याचे उघडकीस आले असून वनविभागाने (Forest Department) यासंदर्भात ट्रस्टला अनधिकृत पार्किंग शुल्क आकारण्यास मनाई केली आहे...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात (Month of Shravan) महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी त्यांच्या निधीतून पिनाकेश्वर मंदिरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी (Fund) उपलब्ध करून दिला. यामध्ये प्रामुख्याने पिनाकेश्वर मंदिरात जाण्यासाठी भाविकांना योग्य रस्ता नसल्याने त्यांना डोंगर चढताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
श्रावण महिन्यापूर्वीच रस्त्याचे (Road) काम युध्दपातळीवर करण्यात आले आहे. संबंधित रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतून गेलेला आहे. असे असतानाही ट्रस्टकडून पिनाकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वाहनधारकांकडून वाहनतळाच्या नावाखाली अनधिकृतपणे पार्किंग शुल्क घेतले जात असून चारचाकी वाहनांसाठी पन्नास तर मोटारसायकलसाठी वीस रुपये आकारण्यात येत आहे. हे वाहनतळ गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आले असून ट्रस्ट कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आणि आर्थिक लुटमारीमुळे अनेक भाविकांना हमरीतुमरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, वनविभागाने कुठल्याही प्रकारचे वाहन पार्किंग शुल्क (Parking Fee) आकारण्याची परवानगी दिलेली नाही. तरी देखील राखीव वनातून (Reserve Forest) भाविकांकडून वाहन पार्किंग शुल्क आकारले जात आहे. विनापरवाना राखीव वनातून पार्किंग शुल्क आकारु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्टला पाठविण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष ढोले यांनी दिली.