टाळ-मृदुंगाच्या गजरात देवमामलेदार रथ मिरवणूक

टाळ-मृदुंगाच्या गजरात देवमामलेदार रथ मिरवणूक

सटाणा । प्रतिनिधी Satana

संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज Saint Shiromani Devmamaledar Yashwantrao Maharaj यांच्या पुण्यतिथी सोहळा काल महापूजा व रथ मिरवणूक chariot procession काढण्यात येवून भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संपुर्ण शहर भगवे ध्वज व पताकांनी तसेच मिरवणूक मार्ग सडारांगोळी टाकून सुशोभित करण्यात आले होते. सनई, टाळमृदुंगाच्या गजरात निघालेल्या रथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल पहाटे 4 वाजता मंदिरात बागलाण तहसीलदार जितेंद्र इंगळे, सुप्रिया इंगळे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरूणा बागड, विश्वस्त रमेश देवरे, सुनंदा देवरे आदींच्या हस्ते महापूजा व अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील शासनातर्फे यात्रोत्सवास परवानगी नाकारण्यात आली असली तरी महापूजा व रथ मिरवणुकीस अटीशर्तीनुसार मान्यता देण्यात आली होती. यात्रोत्सव रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला असला तरी दुपारी 12 वाजता देवमामलेदार मंदिराजवळ पोलीस उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पो.नि. सुभाष अनमुलवार यांच्या हस्ते रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आ. दिलीप बोरसे, माजी आ. संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल मोरे, विजय वाघ, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, सनपा मुख्याधिकारी नितीन बागुल, अ‍ॅड. विजय पाटील, नगरसेवक राहुल पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीच्या मार्गावर सडारांगोळी काढण्यात आली होती. यावेळी भजनी मंडळ व सनई वादक सहभागी झाले होते. सुवासिनींतर्फे रथाचे औक्षण करण्यात आले. देवमामलेदारांच्या रूपात मिरवणुकीत सहभागी झालेल्या बालकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.

मंदिर परिसरात देवस्थानतर्फे बॅरिकेटस् लावून नियंत्रीत स्वरूपात भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. पोलीस यंत्रणेतर्फे गर्दी होवू नये यासह वाहतूक नियंत्रण करण्यात आले. भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारातील देवमामलेदारांच्या मंदिरात पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, निर्मला अनमुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम यांनी पूजा केली. तसेच तहसील कार्यालयात असलेल्या महाराजांच्या ऐतिहासिक खुर्चीचे तहसीलदार जितेंद्र इंगळे व सुप्रिया इंगळे यांनी पुजन केले.

शासकीय आदेशानुसार प्रांत बबन काकडे यांची नगर परिषदेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथेप्रमाणे देवमामलेदार मंदिरात संपन्न होणार्‍या महापुजेत तहसीलदार व देवस्थानचे अध्यक्ष यांच्या समवेत नगर परिषदेचे प्रशासक म्हणून प्रांताधिकारी सपत्नीक सहभागी होतील असे संकेत देवस्थानतर्फे प्राप्त झाले होते. परंतू शासकीय आदेशाची प्रत महापुजा कालावधीपर्यंत प्रांत काकडे यांना प्राप्त झाली नसल्यामुळे महापुजेत त्यांचा सहभाग होवू शकला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com