देवळाली कॅम्प । वार्ताहर

ग्रामपंचायत निवडणुकांत ईर्षा, चुरस, स्पर्धा निर्माण होते. कधी कधी टोकाची भूमिका घेतली जाऊन नात्यागोत्यांत दुरावा, दुश्मनी निर्माण होते. यातून कुटुंबातील व्यक्ती एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात उतरतात. त्यामुळे कुटुंबातदेखील वाद निर्माण होऊन ते कुटुंब राजकारणात होरपळले जाते.

या सगळ्या बाबी टाळण्यासाठी तसेच गावातील शांतता, ऐक्य, समंजसपणा कायम टिकून राहून गावाचा विकास व्हावा, आपापसात मतभेद होऊ नयेत तसेच करोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावरही निवडणुकांचा ताण पडू नये यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणे काळाची गरज आहे, असे स्पष्ट मत आ. सरोज आहिरे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, या निवडणुकांमुळे मने दुभंगली जातात. उमेदवारांचे आर्थिक नुकसानही होते.

निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाचा वेळ व खर्च वाया जातो. म्हणून देवळाली मतदारसंघातील या निवडणुका जी गावे बिनविरोध पार पाडतील त्या गावांना आपल्या आमदार निधी व इतर निधीतून 25 लाख रुपये उपलब्ध करून देईन. तेव्हा सुज्ञ ग्रामस्थांनी सामंजस्याने विचार करा, प्रशासनाला सहकार्य करा आणि गावातील एकोपा वृद्धिंगत करा, असे आवाहन आ.अहिरे यांनी केले.