फुटपाथ प्रकल्प विकसित करा

स्मार्ट सिटीला मनपाचे पत्र
फुटपाथ प्रकल्प विकसित करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शालिमार परिसरातील महात्मा फुले कलादालनाच्या समोरच्या बाजूला अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पत्र्यांचे शेड उद्ध्वस्त केले. मात्र या जागेवर पुन्हा अशाप्रकारच्या अनधिकृत झोपड्या उभारल्या जाण्याची शक्यता असल्याने स्मार्ट सिटीने या परिसरात तत्काळ आपला प्रलंबित फुटपाथचा प्रकल्प विकसित करावा, अशा आशयाचे पत्र अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य अधिकार्‍यांना पाठवले आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महात्मा फुले कलादालन व त्यासमोरील रस्त्यावरील फुटपाथ विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र रस्त्याच्या एका बाजूने अनधिकृतपणे पत्र्यांचे पक्के शेड बांधण्यात आलेले असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेता आला नाही. महात्मा फुले कलादालनाचे काही काम केल्यानंतर स्मार्ट सिटीने हा प्रकल्प थांबवला होता. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत या झोपड्या हटवल्याने आता हा भूखंड पूर्णत: रिक्त झाला आहे. अशात स्मार्ट सिटीने हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अशा आशयाचे पत्र स्मार्ट सिटीला पाठवले आहे.

पत्रात म्हटले की, 4 मे रोजी महापालिकेच्या अतिक्रमण व नगरनियोजन विभागाने सकाळी 6 वाजेपासून संयुक्त कारवाई राबवत शालिमार परिसरातील सर्व्हे नं. 618 येथील 18 व 12 मीटर रस्त्यात बांधलेल्या अनधिकृत टपर्‍या हटवल्या आहेत. तरी या रस्त्यावर स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेण्यात आलेली विकासकामे त्वरित सुरू करण्यात यावीत. त्यास विलंब लावू नये, अन्यथा या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होण्याची दाट शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे..

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महात्मा फुले कलादालन तसेच कलादालनासमोरील रस्त्यावरील फुटपाथ विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र अतिक्रमणामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता या भागातील अतिक्रमणे हटवण्यात आली असून स्मार्ट सिटीने तत्काळ या भागातील विकासकामे पूर्ण करावीत.

- करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण, मनपा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com