'नासाका' सुरू करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

'नासाका' सुरू करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

पळसे ग्रामस्थांचा एकमुखी ठराव

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

गेल्या आठ वर्षापासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना ( Nashik Cooperative Sugar Factory )कोणत्याही माध्यमातून सुरू होत असेल तर तो सुरू करणार्‍याच्या पाठीमागे संपूर्ण पळसे ग्रामस्थ (Palse villagers )उभे राहतील, असा एकमुखी ठराव करण्यात आला.

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर या चार तालुक्यातील 17 हजार सभासदांच्या मालकीचा नाशिक सहकारी साखर कारखाना 2013-14 पासून बंद असल्याने शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायीक, सहकारी सोसायटी, पतसंस्था यांची मोठी अडचण झाली आहे.

शिवाय या घटकांवर अवलंबून असणारे हजारो नागरिक हवालदील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्याने कार्यक्षेत्रांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पळसे ग्रामस्थांनी काल बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कामगार, शेतकरी वर्ग, नासाका सभासद उपस्थित होते.

यावेळी सर्वानुमते असा ठराव करण्यात आला की, सर्व पक्षभेद, मतभेद विसरून चार तालुक्यांची असलेली ही महत्वपूर्ण सहकारी आस्थापना पूर्ववत चालू होण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करावे आणि ज्या कोणा संस्था अथवा व्यक्तीच्या माध्यमातून कारखाना पूर्ववत चालू होऊ शकतो, त्याच्या पाठीमागे सर्व ग्रामस्थांनी भक्कमपणे उभे राहावे, असा ठराव करण्यात आला.

तसेच कारखाना बंद असल्याने शेतकरी वर्गास येणार्‍या अडचणी, कामगारांचे थकलेले वेतन, उसाची विल्हेवाट कोठे लावायची, कारखाना जमीन अशा विविध विषयांवर विष्णूपंत गायखे, शिवराम गायधनी, तानाजी गायधनी, मधुकर गायधनी आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक दिपक गायधनी यांनी केे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, नवनाथ गायधनी,ज्ञानेश्वर गायधनी, मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, विष्णुपंत गायधनी, श्रीकांत गायधनी, अनिल गायधनी संजय गायधनी, नामदेव गायधनी, विलास गायधनी, संतोष गायधनी आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com