
दिंडोरी । संदिप गुंजाळ Dindori
मोहाडी ते साकोरे रस्ता सुधारणा करण्याचे उद्घाटन दि. 16 जानेवारी 2022 रोजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाला. रस्त्यावर खडीही येऊन पडली परंतु गेल्या वर्षभरात त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याने नेमका हा उद्घघाटनाचा अट्टहास कशापायी केला होता? रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसेल तर ती खडी उचलून घेऊन जा असे संप्तत प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
उद्घाटन संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला होता. मग निधीची तरतूद जर नसेल तर प्रशासन दिशाभूल का करते? आणि निधी उपलब्ध असतांना जर कामाला सुरुवात होत नसेल तर जनतेची छळवणूक कशासाठी? असा सवाल उपस्थित करत आठ दिवसांत जर कामाला सुरुवात झाली नाही तर संबंधित विभागाच्या विरोधात रस्त्यावर उपोषण सुरू करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद गटनेते व मविप्र संचालक प्रविण जाधव यांनी दिला आहे.
मोहाडी चौफुली ते साकोरे रोडवरील दिंडोरी हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु एक वर्ष होऊनही त्या कामाला सुरुवात होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्याला निधी नसेल तर देखावा कशापायी केला? असा सवाल उपस्थित करुन नारळ फोडण्यापेक्षा काम पूर्ण करण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.
मोहाडी ते साकोरे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला खडीचा गंज ठीकठिकाणी टाकलेले आहे. परंतु रस्त्याच्या कामाला सुरुवात नसल्यामुळे येणार्या जाणार्या वाहनांमुळे खडीचा गंज पसरला गेला आहे. खडी पसरून रस्त्यावर आली आहे. रस्त्यावरून वाहने जात असताना वाहनाच्या टायराखाली खडी येऊन खडी रस्त्याच्या कडेला उडते. त्यामुळे पायी जाणार्या कित्येक नागरिकांना जखमी होण्याची वेळ आली आहे.
दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे कित्येकांना दुखापतीला सामोरे जावे लागले आहे तरी संबंधित प्रशासन याकडे पुर्णता हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे हे विशेष. जवळपास गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एक वर्ष पूर्ण होऊन देखील या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकर्यांसाठी पिंपळगाव मार्केटला जाण्यासाठी हा सोयीचा रस्ता आहे.
निफाड व दिंडोरी या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याला निधी मिळत नसल्यामुळे हा रस्त्याला रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी वारंवार निधीची मागणी होत असतांना देखील या रस्त्याला वाटण्याच्या अक्षदा मिळतात हे विशेष. ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता स्थानिक कार्यकर्त्यांच्या हट्टापायी लोकप्रतिनिधींनी उद्घाटनाचा देखावा तर केला नसेल ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई होत असतांना कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता आपला नेता किंवा आपला लोकप्रतिनिधी जनतेचे कामे कसे करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु श्रेय लाटण्याच्या नादात आपला नेता अथवा लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित होणार नाही याची काळजी देखील कार्यकर्त्यांनी घेणे अपेक्षित आहे. जर कार्यकर्त्यांच्या हट्टापायी व निधीची उपलब्धता नसताना या रस्त्याचे उद्घाटन झाले असेल तर वर्षभरात झालेल्या अपघातात झालेल्या जखमी लोकांचे तसेच वाहनांचे झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मग प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतांनाही अद्याप त्या रस्त्याच्या कामाला प्रारंभ का होत नाही? असा सवाल उपस्थित करून जर आठ दिवसांत या कामाला सुरुवात झाली नाही तर रस्त्यावर बसून आंदोलन केले जाईल व होणार्या परिणामास संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा माजी जिल्हा परिषद गटनेते व मविप्रचे संचालक प्रवीण जाधव यांनी दिला आहे.
निवडणुका तत्काळ घ्या
प्रशासकीय अधिकार्यांवर वचक ठेवणे आज गरजेचे असून त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या निवडणुका लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. जेणेकरून सर्व स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांवर वचक ठेवणे व त्यांच्याकडून वेळेवर कामे करून घेणे लोकप्रतिनिधींना हातभार लागेल त्यामुळे शासनाने देखील राजकीय हेतू समोर न ठेवता जनकल्याणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात अशी मागणी सध्या ग्रामीण भागातून होत आहे.