ओझे |वार्ताहर

स्पर्धेच्या आणि संगणकाच्या युगात वावरत असतांना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेले चिंतनाच्या आधारावर देसी जुगाड दिंडोरी तालुक्यातील वर्खेदा येथील विद्यार्थ्यांनी केलेला दिसून येत आहे...

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अद्याप शाळेची कवाडे उघडलेली नाहीत. पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी भरपूर वेळ मिळत असून या वेळेचा उपयोग करून काही विद्यार्थी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात.

आंबे वरखेडा येथील कृष्णा राजेश वडजे (इयत्ता १०वी) व शिवम ज्ञानेश्वर वडजे (इयत्ता ६वी) या दोन्ही बंधूनी एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग करत बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत केवळ तीन हजार रुपये खर्च करत सायकलचा प्रयोग यशस्वी केला आहे. हे दोन्ही विद्यार्थी रा स वाघ संस्थेच्या कादवा इंग्लिश स्कुल राजरामनगर येथे शिक्षण घेत आहेत.

कृष्णा वडजे याने इयत्ता ८वी ला असतांना ब्लोअर तयार केले होते. चार्जिंगवर स्कुटर चालते याची प्रेरणा घेऊन आम्ही विचार केला. इलेक्ट्रिकवर चार्जिंग करून सायकल चालू शकते का? बाजारात चार्जिंगवर चालणारी सायकल उपलब्ध आहेत.

पण सर्वसामान्य लोकांना ती सायकल घेणे आर्थिक दृष्टया शक्य नाही. म्हणून टाकाऊ पासून टिकाऊ कमीत कमी खर्चात चार्जिंग ची सायकल तयार करण्याचा आम्ही निश्चय केला. सायकल ला चार्जिंग बॅटरी बसविण्यासाठी एकूण तीन हजार रुपये खर्च आला.

यासाठी लागणाऱ्या 12volt व 250 वॅट मोटर, 12 volt बॅटरी, mcb स्विच, 1.5 नंबर वायर, बाईकच्या इंजिनचे स्पोकेट घेतले.व इंजिन मधील टायमिंग चैन घेतली.

मोटरीचे माप घेत सायकलला मोटर बसविण्यासाठी लोखंडाची पट्टी बसवून त्या पट्टीला छिद्र पाडले व सायकल च्या पुढच्या चाकाला वेल्डिंग केली. तिथे मोटार बसविली. स्पॉकेट चाकाला जोडले.

टायमिंग चैन मापानुसार कमी करून मोटर बसविली व नंतर बॅटरी ठेवण्यासाठी स्टँड तयार करून त्यास फिट केली. एमसीबी स्विच ब्रेक जवळ जॉईन केला व वायर बॅटरीला जॉईन केली. अशा पद्धतीने सर्व जोडणी केली व बॅटरी चार्ज करून ३० मिनिटात 5 किमी अंतर सायकल बॅटरीवर चालू शकते अशी साकारली.

या प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा चेअरमन उत्तम बाबा भालेराव सर्व संचालक व परिसरातून कौतुक केले जात आहे.