नाशिकरोड । Nashikroad (प्रतिनिधी)

इंडियन एअर फोर्समध्ये पायलट पदाच्या निवडीसाठी झालेल्या परीक्षेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी चिरंजीव भार्गव सतीश देशपांडे भारतात प्रथम आला.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, सचिव अश्विनीकुमार येवला, शाळेचे शाळा समितीचे अध्यक्ष जयंत मोंढे, शाळेचे प्राचार्य दिलीप वाणी, उपप्राचार्य डी. यु. अहिरे, वर्गशिक्षिका रूपाली झोडगेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पाचवी ते दहावीपर्यंत पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेताना भार्गवने विविध स्पर्धा,परीक्षा, कला, खेळांमध्ये सहभाग घेतला.

तो दहावी 2013 मध्ये उत्तीर्ण झाला. पुण्याच्या मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअर झाला. 2016 ते 2019 या दरम्यान एअर विंग एनसीसी पूर्ण केले. कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेसच्या परीक्षा दिल्या. त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

नंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या एनसीसी एन्ट्री फ्लाईंगमध्ये देशात प्रथम आला आहे. आता 74 आठवड्यांचे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथील एअर फोर्स अॅकाडमीमध्ये तो रुजू होत आहे. देशात प्रथम आल्याची बातमी भार्गवने सर्वप्रथम पुरुषोत्तम शाळेला कळवली. शाळेने मला घडविल्यामुळेच मी आज प्रगतीपथावर आहे, असे त्याने नमूद केले.