नाशिक । प्रतिनिधी

झळाळी ही सुवर्ण व्यवसायाची मुख्य ओळख! केवळ सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री म्हणजे सराफ व्यवसाय, असे पारंपरिक स्वरूप आता या व्यवसायाला राहिलेले नाही. स्पर्धेच्या युगात नित्य नवे बदल होताना सुवर्ण व्यवसायानेसुद्धा आपले रूप बदलले आहे.

पारंपरिकता आणि आधुनिकता यांची सांगड घालून या व्यवसायात यशस्वीतेच्या कसोटीवर खरेपणाने उतरलेले नाव म्हणजे नाशिकरोडमधील ‘गोविंद दंडे अॅण्ड सन्स’चे संचालक योगेश्वर दंडे! कष्टाला जिद्दीची जोड असल्यावर ध्येय गाठता येते याची प्रचिती या तरुण सराफ व्यावसायिकाकडे पाहताच येते.

योगेश्वर दंडे यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या सेंट झेवियर्स व रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. नाशिकमधील ‘अशोका’मधून त्यांनी बीबीए पदवी प्राप्त केली. एकत्र कुटुंब पद्धतीत वावर असल्याने शिक्षण घेताना अनेक उपक्रमांत सहभाग घेतल्याने त्यांच्यातील नेतृत्वगुण उजळून निघाले. शिक्षण आणि नेतृत्व गुणांचा वापर पुढे कौटुंबिक व्यवसायात करायचा याच उद्देशाने त्यांनी वाटचाल केली. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईच्या एस. पी. जैन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

तेथे ‘फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट’ या विशेष अभ्यासक्रमात शिक्षण घेतले. सन 2017 मध्ये आपल्या कौटुंबिक सुवर्ण व्यवसायात त्यांनी पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात पारंपरिकता जपताना कुटुंबाच्या नावलौकिकात भर टाकणे, नावीन्याचा ध्यास आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपणे या तिन्ही कसोट्यांवर एकाच वेळी मार्गक्रमण करायचे आव्हान त्यांच्यापुढे होते. या वाटचालीत कुटुंबाचा पाठिंबा आणि सर्व सेवकवृंद यांचे सहकार्य खूप महत्त्वपूर्ण ठरले. किंबहुना त्यांच्याशिवाय यश दुरापास्त होते, अशी प्रामाणिक कबुली योगेश्वर दंडे देतात.

वडिलांची आणि काकांची शिकवण, त्यांचे कष्ट बालपणापासून पाहत आलो आहे. व्यवसायवृद्धी करताना छोटे-मोठे उपक्रम राबवले. त्यात यश मिळत गेले. कुटुंबाचा विश्वास संपादन केला. आता जुन्या-नव्याचा सुयोग्य समन्वय साधून व्यवसायाचा सुवर्णकलश गगनाला भिडवायचा प्रवास सुरू केला आहे. त्यादृष्टीने आमच्या दालनात स्वतंत्र डायमंड विभागाची निर्मिती केली असल्याचे दंडे सांगतात.

प्लॅटिनम, हिरे-मोती अशा किमती दागिन्यांकडे ग्राहकांना खेचून त्यांचे राहणीमान उंचावण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न या व्यवसायाद्वारे केले जात असल्याचे योगेश्वर नमूद करतात. नागरिकांत मोती, हिरे यांचे आकर्षण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सुवर्ण व्यावसायिकांनी घेतलेले कष्ट आहेत.

प्रत्येकाच्या मुठीत हिरा येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण नाशिकमध्ये डायमंडचे शेकडो प्रकार व तेसुद्धा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यातील, असे आमच्याकडेच उपलब्ध आहेत. याशिवाय ग्राहकांना सुवर्ण खरेदीचा पुरेपूर आनंद देण्यासाठी आमच्या दालनात एका विशिष्ट म्युझियमची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात सोन्याचा प्रवास कसा झाला याबाबत इत्यंभूत माहिती आहे. सुवर्ण दालनात असे म्युझियम केवळ ‘गोविंद दंडे अॅण्ड सन्स’ येथेच पाहावयास मिळते.

दालनातील इमिटेशन ज्वेलरी विभागाचे स्वरूप मोठे करणार आहोत. दरवर्षी श्रावण महिन्यात ‘एक दागिना एक महोत्सव’ ही वर्षानुवर्षांपासूनची प्रथा आम्ही राबवत आहोत. त्यात पैंजण, कर्णफूल, मंगळसूत्र, बांगडी आदींचे हजारो प्रकार एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जातात, असे ते म्हणतात. या व्यवसायातून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ‘गोविंद दंडे अॅण्ड सन्स’चे संचालक योगेश्वर दंडे या नवउद्योजकाने कौटुंबिक व्यवसायाला दिलेला कॉर्पोरेट टच वाखाणण्याजोगा आहे.

व्यवसाय करताना सचोटी, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या गुणांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या त्रिसूत्रीच्या जोरावरच ग्राहकांची विश्वासार्हता प्राप्त होते. सुवर्ण व्यवसायात अस्सलता हा सुवर्ण व्यावसायिकाचा स्थायीभाव असणे गरजेचे आहे.

: योगेश्वर दंडे, संचालक, गोविंद दंडे अॅण्ड सन्स, नाशिकरोड