खिन्न मनाला उभारी मिळाली...

खिन्न मनाला उभारी मिळाली...

नाशिक । प्रतिनिधी

दैनिक ‘देशदूत’ने कालच्या अंकाचे पहिल्या पानावर जगण्याचा उत्सव साजरा करणार्‍या सकारात्मक बातम्या वाचकांपर्यंत पोचवल्या. वाचकांनीही त्याचे भरभरून स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात दोन प्रतिक्रिया देत आहोत.

मा. संपादक,

देशदूतचे सकारात्मक बातम्यांनी व चैतन्याने भरलेले पहिले पान वाचून आजच्या करोना महामारीने खिन्न झालेल्या मनाला उभारी मिळाली. या पानाचा आदर्श इतर माध्यमांनी घ्यावा. न्यूज चॅनलच्या सततच्या नकारात्मक बातम्यांनी माणसांची मने सुन्न झाली आहेत. नकारात्मक विचारांनी माणसांची प्रतिकारशक्ती कमी होते. माणसाला जीवनाचा अर्थ कळण्यासाठी सकारात्मक विचारांची नितांत गरज आहे आणि ते सकारात्मक विचार प्रसारमाध्यमांनी माणसाच्या मनःपटलावर बिंविणे काळाची गरज आहे. अशा सकारात्मक बातम्यांनी वाचकांचे मनोधैर्य टिकून राहते.

माणसाच्या तुलनेत फुलांचे व फुलपाखरांचे आयुष्य फक्त काही दिवसांचे असते तरीही ते आनंदाने जगतात. माणसाचे जीवन त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक असते पण आपण दुःख उगाळत बसतो आणि जीवन अधिक दुःखी करुन टाकतो. करोना सारखी महामारी, रोग, संकटे, अडचणी तात्पुरते असतात ढग गेले की आभाळ निरभ्र होते सूर्यप्रकाश येतो त्याप्रमाणे संकटे अडचणी दूर झाल्या की आपले जीवन आनंदी बनते मन करा रे प्रसन्न ।सकळ सिद्धीचे कारण असे संत तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. म्हणून माणसाने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे मदेशदूतफचे सकारात्मक बातम्यांनी भरलेले पान वाचून वाचकांना निश्चितच जीवन जगताना उभारी येईल व जीवनरुपी मोगरा आनंदाने फुलून, बहरून येईल यात शंका नाही. देशदूतचे संचालक, कार्यकारी संपादक व सर्व टीमला धन्यवाद

लक्ष्मण पडोळ, कसबेसुकेणे

मनोबल उंचावणारा समयोचित उपक्रम!

मा. संचालक, संपादक,

नैराश्याने काळवंडलेल्या सध्याच्या वातावरणात जगण्याचा आणि त्याचबरोबर वाचनाचाही उत्सव साजरा करण्याची संधी आज दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार ! खरं तर आजकाल वर्तमानपत्र वाचायला घेताना किंवा न्यूज चॅनल घताना उरात धडकी भरते. करोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून आजार, मृत्यू, कुणाचं अपयश, कुणाचा नाकर्तेपणा, निराशा, हतबलता याचाच भडिमार प्रसिद्धी माध्यमांतून अहोरात्र होत आहे. कुणीतरी, कधीतरी कुठल्यातरी कोपर्‍यात का होईना हुरूप वाढवणारं, उमेद जागवणारं काही चांगलंही छापावं असं वाटायचं.

तथाकथित राष्ट्रीय माध्यमांकडून तसं काही घडण्याची सूतराम शक्यता नाही याद्दल माझ्या मनात शंका नाही. जनतेशी नाळ जुळली आहे असं एखादं प्रादेशिक किंवा जिल्हा दैनिकच ते करु शकेल असं वाटायचं. ती अपेक्षा मजगण्याचा उत्सवफ पहिल्या पानावर ठासठशीतपणे चितारुन देशदूतफने पूर्ण केली. अर्थात प्रसंगी प्रवाहाविरुध्द जाण्याचं धाडस आणि समाजहितासाठी अभिनव उपक्रम राबविण्याची उपक्रमशीलता मदेशदूतफने नेहमीच दाखविली आहे. त्याच्याशी सुसंगत आणि सध्याच्या अत्यंत भयग्रस्त, तणावपूर्ण वातावरणात धीर देणारा, मनोबल उंचावणारा समयोचित असा हा उपक्रम आहे. त्याबद्दल दै.देशदूतचे संचालक आणि संपादक यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार.

एक वाचक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com