Deshdoot News Impact : रस्ता प्रश्नी केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन

Deshdoot News Impact : रस्ता प्रश्नी केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन

Deshdoot News Inpact : Union Minister assures road issues

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

नाशिक - दिंडोरी - कळवण ( Nashik- Dindori- Kalwan )या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक व त्या मानाने अरुंद रस्ता त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून या रस्त्याचे रुंदीकरण होण्यासाठी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा ( National Highway )दर्जा मिळावा, या मागणीचे सविस्तर वृत्त दैनिक 'देशदूत'ने प्रसिध्द करताच त्याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar )यांनी घेवून नाशिक - कळवण या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा लवकर मिळण्यासाठी मी प्रयत्नशील असून त्यात लवकरच यशस्वी होईल, असे आश्वासन देत तो पर्यंत राज्याने या रस्त्याची जबाबदारी न झटकता आवश्यक सुधारणा करावी, असा उपरोधिक टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लगावला.

नाशिक - कळवण रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळवून तो रहदारीसाठी सोयीस्कर व्हावा, यासाठी माझा देखील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्यात मी लवकरच यशस्वी होईल, यात शंका नाही. परंतू तो पर्यंत राज्य सरकारने त्या रस्त्याची जबाबदारी न झटकता पर्यटन स्थळ व तीर्थस्थळाला जाण्याचा मार्ग म्हणून आवश्यक सुधारणा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

नाशिक - कळवण रस्त्यावर सध्या वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले सप्तशृंगीगड, दुसरीकडे सापुतारा सारखा पर्यटन स्थळ तसेच दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र यामुळे पर्यटक व भाविकांचे मांदीयाळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून देखील या रस्त्याची ओळख आहे. औद्योगिक वाहतूक तसेच शिर्डी जाणारे भाविक यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामानाने रस्त्याची रुंदी अल्प प्रमाणात असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

त्याचबरोबर अरुंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडीचे प्रमाण देखील वाढले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद होण्यासाठी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे दैनिक 'देशदूत'ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दखल घेवून ही मागणी लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत सातत्याने चर्चा झाली आहे. नाशिक - कळवण रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आदी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतू त्या दृष्टीने कोणतीही हालचाल दिसत नाही, हे विशेष !. दिंडोरी सारख्या ठिकाणी चौफुलीवर सिंग्नल बसवावा, अशी मागणी होत असतांना ती देखील अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आजही तेथे कायम आहे. तरी त्या दृष्टीने राज्य सरकारने देखील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाला जोडणार्‍या रस्त्यांची आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार सोबतही माझे बोलणे सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

राज्य सरकारने जबाबदारी झटकु नये

देशातील अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळण्याच्या मागणी यादीत आहे, परंतू केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देत देशाच्या सरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांना प्राधान्यक्रम दिले आहे. त्यानुसार निधींच्या उपलब्धेनुसार रस्त्यांना राष्ट्रीय दर्जा देत रस्त्यांची सुधारणा प्रगतीपथवार सुरु आहे. त्यानंतर निधीच्या तरतुदीनुसार उर्वरीत रस्त्यांना देखील राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळेल. त्यात नाशिक - कळवण रस्त्याचा देखील समावेश असेलच, यात शंका नाही. तो पर्यंत राज्य सरकारने जबाबदारी न झटकता आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.