
अंबासन । वार्ताहर Ambasan
ग्रामस्थांनी लोकसहभागातून मोसम नदीवर बांधलेल्या बंधार्यास संरक्षक भिंतीअभावी भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दै.‘देशदूत’मध्ये प्रसिध्द झालेल्या विशेष वृत्ताची दखल घेत संरक्षक भिंतीसाठी निधीची उपलब्धतता करत बागलाण आ. दिलीप बोरसे व जि.प. माजी सभापती यतीन पगार यांनी आज संरक्षक भिंतीच्या कामाचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले.
ठेकेदारांकडून टक्केवारी घेत स्वत:चा विकास करण्यापेक्षा बागलाण तालुक्याचा विकास करणे हेच आपले ध्येय असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तालुक्यात ठिकठिकाणी विकासकामांची पूर्तता केली जात असल्याची माहिती आ. दिलीप बोरसे यांनी यावेळी बोलतांना दिली. संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आज झाले आहे. येत्या चार दिवसात या कामास प्रारंभ होईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणासह गावात काँक्रीटीकरण, अंबासन-मालेगाव-वळवाडी रस्त्यांचे डांबरीकरण आदी विकासकामे दीड कोटीपेक्षा अधिक निधीतून साकारली जाणार आहेत.
अंबासनसारख्या स्वाभिमानी गावाचा विकास करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगत आ. बोरसे पुढे म्हणाले, तालुक्यात विकासकामांचा दर्जा चांगला राहावा याकडे आपले लक्ष आहे. ठेकेदारांकडून टक्केवारी घेतल्यास आपला विकास होईल. मात्र विकासकामांचा दर्जा राहणार नाही. त्यामुळे पैशांची मागणी न करता दर्जा असलेली कामे करण्यास आपण संबंधितांना भाग पाडत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी मार्गदर्शन करतांना माजी जि.प. सभापती यतीन पगार यांनी बागलाण तालुक्याच्या विकासासाठी आपण राजकीय जोडे बाजुला ठेवून आ.बोरसे यांच्याबरोबर असल्याचे सांगितले.
मोठ्या प्रमाणात प्रलंबित विकासकामे निधीच्या उपलब्धतेने मार्गी लागत असल्याचे स्पष्ट करत पगार पुढे म्हणाले, ज्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे तेच काम हाती घेतले जात आहे. मात्र काही विरोधकांतर्फे ठराविक ठिकाणीच आमदार काम करत असल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहेत. .
विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आम्ही आणला असल्याने भविष्यात विविध कामे ग्रामस्थांच्या दृष्टीस पडतील, अशी ग्वाही पगार यांनी शेवटी दिली. कार्यक्रमास बाजार समिती माजी सभापती पंकज ठाकरे, मोराणे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, डॉ. सुभाष भामरे, अमित पगार, संदीप कापडणे, उपसरपंच शरद पवार, ग्रा.पं.सदस्य शशिकांत कोर, भाऊसाहेब भामरे, शैलेंद्र कोर, विजय गरूड, सुकदेव अहिरे, हेमंत कोर, नितीन कोर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.एस.पाटील यांनी केले.