Deshdoot News Impact : जलवाहिनी दुरुस्तीस सुरुवात

पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांचे निर्देश
Deshdoot News Impact :  जलवाहिनी दुरुस्तीस सुरुवात

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगावसह (Lasalgaon ) 16 गाव पाणीपुरवठा योजनेबाबत ( Water Supply Scheme )जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या दालनात 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत नवीन योजना कार्यान्वित होईपर्यंत 16 गावच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी ( Water Supply Pipe Line Repair Works ) 15व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून खर्च करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्याने अखेर या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

लासलगाव, विंचूरसह 16 गावांची तहान भागवण्यासाठी जल प्राधिकरण योजनेअंतर्गत नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सदरच्या योजनेला आता अनेक दशके लोटल्याने या योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने ती अनेक ठिकाणी फुटून पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. साहजिकच या योजनेअंतर्गत अनेक गावांना 15 दिवसांतून अल्पसा पाणीपुरवठा होऊ लागल्याने लासलगाव, विंचूर, टाकळी, कोटमगावसह परिसराच्या गावातील ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपोषणासह आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

दै.‘देशदूत’ने ( Daily Deshdoot )देखील याबाबत दि.21.4.2022, 27.4.2022 रोजी लासलगाव, टाकळी, विंचूर पाणीप्रश्नाबाबत वृत्त प्रकाशित केले होते. परिणामी दै. देशदूतची कात्रणे ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दाखविल्याने व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने अखेर या योजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

निफाड पं.स.चे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी या योजनेच्या दुरुस्तीसाठी लासलगाव 25 लाख रुपये, विंचूर 20 लाख रुपये, टाकळी 10 लाख रुपये, पिंपळगाव नजिक 10 लाख रुपये या निधीतून खर्च करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सदर कामास स्वतः उभे राहून अधिकारी वर्गाने युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली आहे. याप्रसंगी सरपंच जयदत्त होळकर, ग्रा.पं. सदस्य रोहित पाटील, अमोल थोरे, विस्तार अधिकारी एस.के. सोनवणे, ललित दरेकर यांनी प्रत्यक्ष रित्या सुरू असलेल्या कामावर उभे राहून काम करून घेण्यास सुरुवात केली. याप्रसंगी लासलगाव ग्रामपालिकेचे सदस्य रोहीत पाटील व अमोल थोरे यांनी लासलगाव वासीयांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यासाठी पाहणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते. तसेच टाकळी विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव या गावांचे कर्मचारी होते.

दोन ते तीन दिवस हे काम सुरू राहणार आहे. तरी हे काम लवकरात लवकर कसे सुरळीत होईल व लासलगावसह इतर गावांना पाणीपुरवठा कसा लवकर करता येईल यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी एस.के. सोनवणे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांच्या देखरेखेखाली काम सुरू आहे. पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.