दै.'देशदूत' वृत्ताची दखल : रस्ते कामास सुरवात

दै.'देशदूत' वृत्ताची दखल :  रस्ते  कामास सुरवात

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी-निळवंडी-हातनोरे रस्त्याचे ( Dindori- Nilvandi- Hatnore Road Works )काम संथगतीने या मथळ्याखाली दै.'देशदूत'ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेत तत्काळ त्या ठेकेदाराला आदेश देत काम सुरु करण्याचे आदेश दिले. त्यावर संबंधित ठेकेदाराने त्या कामाला सुरुवात केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय थांबू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असून दैनिक देशदूतने दखल घेण्यास प्रवृत्त केल्याबद्दल 'देशदूत'चे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन दिंडोरी - निळवंडी- हातनोरे रस्त्याचे काम चालू आहे. परंतु वर्षामागुन वर्ष लोटली जातात परंतु रस्त्याची प्रगती काही होत नाही हेच वास्तव आहे. रस्त्याचे काम अचानक बंद होवून जाते. जनतेनी ओरड केली की जरा सुरू होते आणि काम चालू झालेच तर अतिशय कासव गतीने सुरू होते. आणि पुन्हा बंद पडते. त्यामुळे या रस्त्याच्यामागील गौडबंगाल काय सर्वसामान्य जनतेला कळलेले नाही.

वारंवार तक्रारी होवूनही लोकप्रतिनिधी देखील मुग गिळून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असल्याबाबत सविस्तर वृत्त दैनिक देशदूतने प्रसिध्द करुन पंतप्रधान ग्राम सडक योजनेतुन सुरू असलेल्या या कामाची अशी अवस्था असेल तर इतर कामाचे काय? असा सवाल उपस्थित केला होता.

यावरुन संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेत संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले असून पावसाळ्यापर्यंत काम पूर्ण करण्याबाबत तंबी देखील दिली आहे. बातमी प्रसिध्द होताच रोलर, जेसीबी व मजूर या ठिकाणी हजर झाले व कामाला गती मिळाली. ही गती तात्पुरती न ठेवता काम पूर्णं होईपर्यंत ती कायम रहावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

दिंडोरी - निळवंडी - हातनोरे रस्त्याचे काम संथगतीने सुरु असताना काही दिवसांपासून बंद पडले होते. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, याबाबत दैनिक देशदूतने रोखठोक व सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच संबंधित विभागाने त्याची दखल घेवून तत्काळ रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. त्याबद्दूल मी निळवंडी ग्रामस्थांच्या वतीने दैनिक देशदूतचे आभार मानतो. तसेच कामाला सुरुवात झाली परंतू ती आता मध्येच न थांबता गतीशिल पध्दतीने पावसाळ्यापुर्वी हे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

गणेश हिरे, ग्रामस्थ, निळवंडी

गती मिळाली आता ब्रेक नको

लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये डांबरीकरणाचे काम करता येत नाही. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यावर या कामाला पुन्हा ब्रेक लागून दिवाळीचा वायदा मिळू नये, ती अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ करीत आहे. निळवंडीच्या रस्त्याला कित्येक वर्षाने मुहूर्त लागला आहे. त्यामुळे ते काम लवकरात लवकर दर्जेदार पध्दतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. दिंडोरी - निळवंडी - हातनोरे हा रस्ता तालुक्यातील प्रमुख रस्त्यापैकी एक असल्याने या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. रस्त्यावर खडी पसरल्याने लहान मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित विभागाने आवश्यक ती काळजी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com