
म्हाळसाकोरे । प्रतिनिधी Mhalsakore
सिन्नरकडून निफाडकडे जाण्यार्या राज्यमार्गावर म्हाळसाकोरे येथील विद्यालयाच्या कंपाऊंडच्या कामासाठीचे मातीचे ढिगारे रस्त्यावर टाकण्यात आले होते. दुर्घटना घडू नये, यासाठी दैनिक ‘देशदूत’ने 26 एप्रिलला वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत मातीचे ढिगारे हटविण्यात आले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. सदाफळ यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने ताबडतोब राज्यमार्ग 27 वरील मातीचे ढिगारे रस्त्यावरून हटवून बाजूला केले. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा हा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, वणी, सापुतारा, नंदुरबार तसेच पुणे, संगमनेर आदी मोठ्या शहरांना जवळून जोडणारा हा महत्त्वाचा राज्यमार्ग असून या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच रस्त्यावर अवैध अतिक्रमण, मातीचे ढिगारे, रस्ताच्या कडेला पार्किंग आपल्या सोयीनुसार लोक करतात.
यातून अपघात घडू नये अथवा अनुचित प्रकाराला आळा बसावा याकरिता दैनिक देशदूतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.