'देशदूत' वृत्ताची दखल : ...अन् बाजारांना लागली शिस्त

रविवार कारंजा, दूध बाजारात गर्दी नियंत्रणात; पोलिसांचा वॉच
'देशदूत' वृत्ताची दखल :  ...अन् बाजारांना लागली शिस्त

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असानाही बाजार पेठांमधील गर्दी कमी होताना दिसत नव्हती. प्रामुख्याने रविवार कारंजा व दूध बाजार येथे बेशिस्त वाहने व होणारी गर्दी यामुळे करोनाचा धोका अधिक वाढत असल्याचे देशदुतने निदर्शनास आणुन दिले होते. याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी दोन्ही ठिकाणची वाहतूक इतरत्र वळवून त्या ठिकाणी बॅरेकेडींग तसेच पोलीस बंदोबस्त तैनात केला. परिणामी मागील दोन दिवसांपासून दोन्ही ठिकाणच्या बाजार पेठांमध्ये चांगली शिस्त पाहवयास मिळत आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने कडक निर्बंध लावून सकाळी सात ते अकरा या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळी अकरा वाजे नंतर ही तसेच सायंकाळी देखील गर्दी होत असल्याचे चित्र होते शहातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, भांडीबाजार, मेनरोड परिसरात तसेच जुने नाशिक परिसरातील दुध बाजार, मंडई परिसरात हेच चित्र होते.

या दोन्ही ठिकाणच्या गर्दी बाबत दैनिक देशदुतने वृत्त प्रसिद्ध करत ही बाब निदर्शनास आणुन दिली. याची तातडीने दखल घेत पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी रविवार कारंजा ते रामसेतुपूल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या ठिकाणी रविवार कारंजा येथे बॅरेकेडींग करण्यात येऊन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भद्रकाली बाजार, महात्मा फुले मंडई, भद्रकाली पोलीस ठाणे परिसर, शहीद अब्दुल हमीद चौक, दूध बाजार, पिंजार घाट, त्र्यंबक पोलीस चौकी आदी भागातील वाहतुकीतही बदल केला.

भद्रकाली पोलीस ठाणे समोरील मौला बाबा दर्गा शरीफ समोर लोखंडी जाळ्या लावून या ठिकाणी चोख बंदोबस्त उभा आहे. त्याचप्रमाणे फाळके रोड येथून येणार्‍यांना कादर मार्केट या ठिकाणी थांबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सारडा सर्कल या ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी उभारून नियोजन करण्यात येत आहे. यामुळे बाहेरून येणार्‍या ग्राहकांची संख्या अगदी कमी झाली आहे तर जे जवळ राहणारे लोक आहे ते पायी जाऊन बाजारातून खरेदी करून लवकरात लवकर परत फिरत असल्यामुळे गर्दी होत नाही.

परिणामी मागील दोन दिवसांपासून रविवार कारंजा ते भांडीबाजार, तसेच जुने नाशिकच्या दुध बाजार व इतर ठिकाणी गर्दी न करता शांततेत सकाळी 7 ते 11 या वेळात बाजार पार पडत आहेत.

हे मार्ग बंद

रविवार कारंजा, भांडीबाजार ते रामसेतू पूल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असून रविवार कारंजा ते मंगेश मिठाई, सोन्या मारुती चौक, भांडी बाजार व रामसेतू पूल हा मार्ग सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान बाजार खुला असल्याच्या कालावधीत वाहतुकीस बंद राहणार आहे.

यासह रविवार कारंजा, गोरेराम गल्ली, सोनार बाजार हा मार्गही बंद असणार आहे. तसेच सध्या सुरू असलेला रमजान महिना, आगामी ईद आणि करोनाचा वाढता संसर्ग या पार्श्वभूमीवर जुने नाशिकमधील दूध बाजार ते हाजी टी स्टॉल (वाकडीबारव) हा रस्ता ठराविक वेळेसाठी नो व्हेईकल झोन करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढले आहेत.

Related Stories

No stories found.