
मेशी । वार्ताहर Meshi
देवळा तालुक्यातील ( Deola Taluka ) मेशी ( Meshi ) येथे एस.टी. बससेवा ( ST Bus Services )बंद असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. यासंदर्भात बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत ‘देशदूत’मध्ये वृत्त प्रसारित होताच आज मेशी येथील बससेवा पूर्ववत सुरू केल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
गत काही महिने एस.टी. कामगारांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी प्रदीर्घ संप पुकारला होता. त्याकाळातही विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. संपामुळे नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने त्यांच्याकडून होणार्या आर्थिक लुटीसह अत्यंत दाटीवाटीने अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागला होता. अलीकडेच एस.टी. कामगारांचा संप मिटल्याने विद्यार्थी व प्रवासीवर्गाला दिलासा मिळाला असताना मेशीकर मात्र अद्यापही एस.टी. बससेवेपासून वंचितच राहिले होते.
सर्व बसेस गावात न येता मुख्य मार्गाने परस्पर निघून जात असल्याने येथील प्रवाशांना तीन ते चार कि.मी. फाट्यापर्यंत पायपीट करावी लागत होती. पुन्हा फाट्यावर तीव्र उन्हाचा तडाखा सहन करत तासन्तास बसची वाट पाहावी लागत होती. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. याबाबत ‘देशदूत’ने वृत्त प्रसारित करून गावातून पूर्ववत बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
त्यास कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने एस.टी. बसच्या गावातून फेर्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी व प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबली आहे. बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांनी आनंद व्यक्त करत ‘देशदूत’ व आगार व्यवस्थापक पगार यांचे आभार मानले. दरम्यान, पूर्वीप्रमाणे बसेस मेशी गावातून मार्गस्थ होतील, अशी ग्वाही आगार व्यवस्थापक पगार यांनी दिली आहे.