देशदूत - नवदुर्गा : जिज्ञासाच प्रकाशाची वाट झाली...

देशदूत - नवदुर्गा : जिज्ञासाच प्रकाशाची वाट झाली...

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आत्मविश्वास Confidence हा नेहमी स्वतः निर्माण करायचा असतो. तोच आत्मविश्वास मी मिळवला. भीतीवर मात करत आत्मिक प्रेरणेतून, अनुभवातून शिकत, कठीणातील कठीण प्रसंगातही सामोरे जाण्याची हिंमत प्रत्यक्ष कामातून मिळत गेली, असे मनोगत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात ‘महावितरण’मध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती वनसे Swati Vanse यांनी केले. ‘देशदूत नवदुर्गा’ उपक्रमात Deshdoot Navdurga Campaign कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या वेगळ्या आणि त्यातल्या त्यात साहसी, जोखमीच्या कार्यक्षेत्राची निवड कशी केली, याविषयी वनसे बोलल्या. लहानपणी जेव्हा कधी टिव्हीवर काहीं चांगला कार्यक्रम सुरू असताना नेमकी वीज जायची तेंव्हा नेमक्या वेळी वीज गेली म्हणून खूप राग यायचा, पण त्याच वेळी असाही प्रश्न पडायचा की, वीज जाते म्हणजे नेमके काय होते? याच कुतुहलातून, जिज्ञासेपोटी लहानपणापासूनच ते जाणून घेण्याची आंतरिक इच्छा होती. पुढे शिक्षण घेताना लाईनमन आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. महावितरणच्या भरतीत संधी मिळाली आणि नोकरीत रूजू झाले.

नोकरीतील पहिल्या दिवसाचा अनुभव त्यांनी सांगितला. एका ग्राहकाची तक्रार सांभाळायची होती. त्यावेळी मनाचा गोंधळ झाला होता. सहकारी अधिकारी यांनी व्यवस्थित समजून सांगितले. त्यानंतर पुढच्याच काही दिवसांत पावसाळ्यात लाईन तुटल्यामुळे रात्री ती जोडण्यासाठी पोहाचणे आवश्यक होते. त्यावेळी नेमके प्रत्येक जण आपापल्या लाईनच्या दुरुस्तीसाठी गेले होते. इकडे लाईन दुरुस्त करणेसुद्धा तितकेच गरजेचे होते. त्यावेळी घेतलेले शिक्षण, अनुभव यातून खांबावर चढून आलेली अडचण दुरुस्त करण्यासाठी हिंमत आली. त्या दिवशी विजेचा आणि माझ्या लहानपणी पडलेल्या ‘वीज का जाते?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

आज नोकरीत 6 वर्षे झाली आहेत. रोज नवीन आव्हाने येतात, पण ती पेलण्याची मानसिकता, आत्मविश्वास आणि अनुभव आज पाठीशी उभा आहे.

आज कामाचा व्याप अधिक आहे. एकीकडे आई, गृहिणी, बायको म्हणून एक जबाबदारी आहे तर दुसरीकडे महावितरणची कर्मचारी म्हणून लोकांच्या घरांना अंधारापासून दूर ठेवत नेहमी प्रकाशमय ठेवण्याची जबाबदारी आहे. परंतु घरच्यांची सोबत, हातभार, प्रोत्साहन नवी ऊर्जा देते तर ग्राहकांसोबत जुळलेले प्रेमाचे, माणुसकीचे संबंध काम करताना कुठली अडचण निर्माण करत नाहीत. मॅडम, आमच्या गावात लाईनमन म्हणून तुम्हीच राहा, असे आवर्जून सांगतात तेंव्हा करीत असलेल्या कामाचा अभिमान वाटतो. समाधान मिळते.

महिला-मुलींना करिअरची संधी

महावितरणातील क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणार्‍या मुली-महिलांना चांगली संधी असल्याचे लाईनमन स्वाती वनसे यांनी सांगितले. देवीची सगळीच रूपे आपल्याला भावतात. कारण येणारे प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याचे सामर्थ्य देवीच्या प्रत्येक रुपात आहे. हेच रूप अंगिकारून पुढे अशीच वाटचाल करत राहणार असल्याचे वनसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.