
नाशिक | प्रतिनिधी Nashik
साधारण कुटुंबात जन्मलेले डॉ. महेश बूब हे मूळचे पिंपळगाव बसवंत येथील आहेत. बालपणापासून 12 पर्यंतचे सर्व शिक्षण त्यांनी पिंपळगाव बसवंत येथेच पूर्ण केले. यानंतर त्यांचा गुणवत्तेवर पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले. मुंबई व पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर 1997 साली त्यांनी पिंपळगाव बसवंत येथेच वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. डॉ. बूब यांनी पिंपळगाव बसवंत शहरात सन 2000 साली पहिली एमबीबीएस डॉक्टरांची ओपीडी मेनरोड येथे सुरू केली.
कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीत आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून ओपीडी सुरू केली. पिंपळगावसह परिसरातील खेड्यांवरील रुग्णांना डॉक्टरांच्या सेवा मिळाव्यात ही गोष्ट डोक्यात ठेऊन हे छोटेखानी हॉस्पिटल सुरू करण्यात आले. शहरातून मुंबई-आग्रा महामार्ग जातो. त्याकाळी अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत होते. अपघात ग्रस्तांना 30- 40 किमी नाशिक शहरात नेताना धावपळ होत. शिवाय लवकर उपचार मिळत नव्हते. बर्याच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असे. याची खंत मनी बाळगून धन्वंतरी हॉस्पिटलची संकल्पना त्यांच्या मनात आली.
ग्रामीण भागातील व पिंपळगाव शहरातील उपचार सुविधा अधिक बळकट करत रुग्णांना उत्तम उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असा विचार डॉ. बूब यांच्या मनात रुळत होता. रुग्णांना बरे करण्याचे प्रमाण वाढवण्यात डॉक्टरांची भूमिका आणि रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळणे हे महत्वपूर्ण घटक लक्षात घेता धन्वंतरी हॉस्पिटल स्थापन करावे असा निश्चय त्यांनी केला. आणि काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या साथीने धन्वंतरी हॉस्पिटल रुग्णसेवेत उभे राहिले.
यानंतर हळुहळु गावे प्रगत होत गेली. तशी तशी सुविधा वाढत गेल्या व वाढत्या महागाईचा त्रासही झाला म्हणून सन 2015 पासून शासनाने अमलात आणलेल्या तत्कालीन स्व. राजीव गांधी जनआरोग्य योजना निफाड तालुक्यासाठी प्रथम मंजुरी मिळवून देणारे पाहिले व्यक्ती म्हणजे डॉ. बूब पिंपळगाव परिसरासोबत एमआयडीसी व सहकार क्षेत्रात होणारी आधुनिक प्रगती बघता कर्मचारी वर्ग व्यापारी वर्ग सुशिक्षित कामगार, हमाल मापारी व कंपनी वर्कसकरिता कंपन्यांच्या माध्यमातून 12 कॅशलेस कंपनीशी जुळणी त्यांनी करून दिली. चांदवड, दिंडोरी, निफाड तालुक्यातील सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होणार्या मधुमेह तसेच किडनी रोगावरील आवश्यक असणारी डायलिसीस ग्रामीण भागात मोठमोठ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह व तज्ज्ञ डॉक्टरांसह त्यांनी मोफत उपलब्ध करून दिले. सन 2015 पासून आजपर्यंत अपघातग्रस्त कुटुंबातील व्यक्तींच्या एकूण 1400 कुटुंबांना हाडांच्या शस्त्रक्रियेचा लाभ त्यांनी मोफत मिळवून दिला.
मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ग्रामीण भागातही यशस्वीरित्या त्यांनी पार पडण्याची किमया साधली. आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने संपूर्ण मेंदूवरील शस्त्रक्रिया त्यांनी केली. ग्रामीण भागात गुडघा प्रत्यारोपणाच्या सहकार्यांच्या मदतीने यशस्वी 100 शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. करोना काळात पहिल्या लाटेत प्रादुर्भाव फक्त शहरांमध्येच अधिक प्रमाणात पाहायला मिळाला. त्यामुळे त्यावेळी शहरातील लोकांनी ग्रामीण भागात येताना पाहायला मिळत होते. मात्र दुसर्या लाटेत ग्रामीण भागात रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढायला लागली होती.
करोनाच्या दुसर्या लाटेत ग्रामीण भागातील गाव,वस्त्या आणि तांड्यांपर्यंत करोना जाऊन पोहचला आहे. मात्र अशावेळी रुग्णालयाबरोबरच सर्वत्र मोफत सुविधा त्यांनी दिल्या. याशिवाय माफक दरात रुग्णांना बेड उपलब्ध व्हावी म्हणून संस्थेच्या माध्यमातून, वैयक्तिक माध्यमातून, सहकार्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. या कामामुळे त्यांना करोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे वैद्यकिय अधिकारी म्हणून गेल्या 30 वर्षापासून डॉ. बूब कार्यरत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहे. शिक्षणानंतर मोठ्या शहरात जाऊन ते कमाई करू शकत होते. मात्र, नेहमीची वहिवाट सोडून त्यांनी आपल्या मातीतील लोकांसाठी रुग्णसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ‘सह्याद्री आरोग्य रत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करणयात आले. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रिती बुब यांच्या मदतीने 100 महिलांचे मोफत गर्भसंस्कार वर्ग त्यांनी चालविले. शहरातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार दिनी मोफत आरोग्य तपासणी (सर्व रोग निदान करणारा) तपासणी त्यांनी केली. जिल्हाभरातून भारतीय सैन्य दलातील नातेवाईकांना ओपीडी व आयपीडी मध्ये 30% पर्यंत सवलत हॉस्पिटलमध्ये दिली जाते. याकरिता 2001 ला त्यांना सैनिक सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.