Deshdoot Impact : विनायकनगर येथील रखडलेल्या पाईपलाईनचे काम अखेर सुरु

Deshdoot Impact : विनायकनगर येथील रखडलेल्या पाईपलाईनचे काम अखेर सुरु

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबक तालुक्यातील गणेशगाव पैकी विनायकनगर या पाडयावर ठेकेदाराने पाणी योजनेचे काम अर्धवट टाकल्यामुळे स्वखर्चाने टँकरने गावाला पाणीपुरवठा करत असल्याचे वृत्त दैनिक देशदूत आणि देशदूत डिजिटलमध्ये १२ मे रोजी प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत तात्काळ रखडलेल्या पाणी योजनेतील पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. 'देशदूत'च्या वृत्तामुळे गावकऱ्यांना न्याय मिळाल्याने ग्रामस्थांनी देशदूतचे आभार मानले आहेत...

विनायकनगर हा पाडा गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहे. येथील सरपंचाने स्वतःचा टॅक्टर देत गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दिवसातून 12 तेरा खेपा केल्या जात आहेत. हे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकल्यानंतर गावाची तहान भागवली जात होती.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी नदीकाठी विहिरही खोदल्याचे सरपंच म्हणाले होते. या विहिरीला भरपूर पाणी देखील लागले असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कामावर नसल्याने काम बंद पडले आहे.

विनायकनगर आणि गणेशगाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई हमखास असते. याचा पाठपुरावा म्हणून पाणी पुरवठा योजनाही आणली पण ती गावापर्यंत पोहचलीच नाही.

त्यामुळे येथील महिलांना दोन किमीची पायपीट करून नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सध्या पाणी पुरवठा योजनेची विहीर खोदली असून तिला पाणीही लागले आहे. परंतु ठेकेदाराने करोनाचे कारण देत अर्धवट काम सोडून दिले आहे.

परिणामी, गावात येणारे पाणी विहिरीतच राहिले असून टंचाईला सामोरे जावे लागत होते. पाण्याची तहान भागविण्यासाठी सरपंचांनी स्वत:चा टॅक्टर देत पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली होती. या प्रकाराचे वृत्त देशदूत आणि देशदूत डिजिटलमध्ये प्रकाशित झाले होते. यानंतर तत्काळ ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अखेरीस रखडलेले काम सुरु करण्यात आले असून लवकरच ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com