
देवळा | प्रतिनिधी | Deola
तालुक्यातील लोहोणेर-माळवाडी रस्त्यावर (Lohoner-Malwadi Road) पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवळा पोलिसांनी (Deola Police) अवैधरित्या वाळू (Sand) वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत...
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१७) रोजी लोहोणेर-माळवाडी रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पहाटेच्या सुमारास पकडण्यात आले. त्यानंतर ते ट्रॅक्टर देवळा पोलीस स्टेशन आवारात जमा करण्यात आले. अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना (Police)गुप्त खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी चालकांकडे वाहतुकीचा (Transport) परवाना मागितला असता त्यावेळी कोणताही वाहतुकीचा परवाना चालकांकडे आढळून आला नाही. त्यानंतर सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करुन मालक व चालकाचे नाव पत्ता घेत चालकांना सोडून देण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ (Purushottam Shirsath) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरांवर सुमारे सहा लाखांवर दंडाची कारवाई होणार असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले.