
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील जानोरी( Janori ) येथील विद्यार्थिनीला वर्गात प्रवेश नाकारण्यावरून गदारोळ झाला आहे. त्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.
ग्रामस्थांनी मुख्याध्यापक अकार्यक्षम असल्याने शाळेचे नुकसान होत असून नऊ - दहा वर्षापासून शाळेचा विकास खुंटला असून वारंवार तक्रार करून देखील त्यांची बदली का होत नाही? असा सवाल उपस्थित करून त्या अकार्यक्षम मुख्याध्यापकाची इतरत्र बदली करा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी केली आहे.
जानोरी जिल्हा परिषद शाळेचे ( Janori Zilla Parishad School )मुख्याध्यापक शाळा प्रशासन सांभाळण्यात असमर्थ असल्याचे निदर्शनास येते. वारंवार शाळेच्या कारभारात काही ना काही तक्रारी येणे हे नित्याचे झाले आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांनी देखील वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी देखील त्यांच्यात सुधारणा होत नाही हे विशेष. गावातील लोकप्रतिनिधींनीही त्यांना तुम्ही ही शाळा सांभाळण्यात असमर्थ आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार इतरत्र बदली करून घ्या अशी समज देखील दिलेली आहे.
परंतु मुख्याध्यापक संवर्ग -1 मध्ये येत असल्याने त्याचा दुरुपयोग करत आहेत. माझी बदली होऊच शकत नाही, मी माझ्या मनाचा मालक असा त्यांचा समज आहे. परंतु त्यांच्या आडमुठेपणामुळे शाळेचे नुकसान होत असून त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्यांनीच यावर निर्णय घेऊन या मुख्याध्यापकाची इतरत्र बदली करावी, अशी मागणी जानोरी गावाच्या वतीने करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीला देखील आपले अधिकार वापरू देत नाही.
बैठकीत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ठराव मांडता येणार नाही, तुम्हाला तो अधिकारही नाही. मी सांगेल तोच ठराव व तोच विषय प्रोसिडिंगवर लिहिला जाईल, असे बोलून उर्मटपणा दाखविला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने देखील गटशिक्षणाधिकार्यांकडे तक्रार केली आहे. ठराविक शिक्षकांचीे पाठराखण तर ठराविक शिक्षकांना धारेवर धरण्याचा प्रकार संबंधित मुख्याध्यापक करतात. त्यांच्याविरुद्ध एखाद्या शिक्षकांने बोलण्याचा प्रयत्नही केला तर त्यांना धारेवर धरत त्यांना लेखी काढणे, कार्यवाहीच्या धमक्या देणे असे प्रकार घडले. गावातील लोकप्रतिनिधींना समझोता घडवून आणावा लागला आहे.
मुख्याध्यापक सूडबुध्दीने वागत असल्याने शिक्षक देखील दडपणाखाली असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे मत शालेय व्यवस्थापन समिती व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. आडमुठेपणाच्या कारभारातून शाळेच्या होणार्या नुकसानीपासून संरक्षण करावे ,अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली आहे.
जानोरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराविषयी कायम तक्रारी येत आहेत. यावर गावच्या वतीने आम्ही जावून समजही दिली आहे. तसेच सोयीनुसार इतरत्र बदली करून घेण्याचा सल्लाही दिला आहे. परंतु त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट तक्रारी वाढतच आहेत. संवर्ग -1 मध्ये येत असले तरी 9-10 वर्ष एकाच ठिकाणी अकार्यक्षम करणे कितपत योग्य आहे ? मुलांच्या भविष्यासाठी गावाच्यावतीने आंदोलन करण्याची तयारी आम्ही केली असून संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच दखल घेऊन या अकार्यक्षम मुख्याध्यापकाची इतरत्र बदली करावी.
शंकरराव काठे, माजी जि. प.सदस्य, जानोरी
दोषींवर कडक कारवाईः कदम
जानोरी गावातील जिल्हा परिषद शाळेविषयी येत असलेल्या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन कोणाचीही पाठराखण न करता दोषींवर कडक कारवाई केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले असून याविषयी सखोल चौकशी करून प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिंडोरी गटशिक्षणाधिकार्यांना दिले आहे.जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षकांनी पटसंख्या वाढेल म्हणून प्रवेश नाकारल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. यावरुन गटशिक्षणाधिकार्यांनी तत्काळ शिक्षण विस्तार अधिकार्यांना शाळेवर पाठवून घटनेची माहिती घेत तक्रारदार व शालेय व्यवस्थापन समितीची लेखी घेतली. यावेळीही शालेय व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांविषयी तक्रारी मांडून न्याय देण्याची मागणी केली. तरी संबंधित विभागाने याविषयी त्वरीत दखल घेवून लवकरात लवकर समस्या कायमची निकामी काढण्यासाठी दोषींवर कार्यवाही, व्हावी, अशा मागणीने जोर धरला आहे. शिक्षण विभाग कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ प्रकाराला मुख्याध्यापक जबाबदार ?
विद्यार्थिनीला प्रवेश नाकारणार्या त्या शिक्षकाविरुद्ध मागील काही दिवसांपूर्वी शालेय व्यवस्थापन समितीने संबंधित शिक्षक आपल्या कर्तव्यात जाणूनबुजून कसूर करतात. त्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करुन समज देण्याबाबत ठराव संमत केला होता. परंतु संबंधित शिक्षकाची पाठराखण करत त्यावर काहीही प्रक्रिया मुख्याध्यापकांनी न केल्याने विद्यार्थिनीला प्रवेश नाकारण्यापर्यंत संबंधित शिक्षकाची मजल गेली. यास सर्वस्व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे.
जानोरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराविषयी अनेकवेळा तक्रारी आल्या आहेत. त्याविषयी असंख्य वेळा गटशिक्षणाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत . परंतु आजपर्यंत पाहिजे ती दखल आणि कार्यवाही झाली नाही याची खंत वाटते. आडमुठे कारभारामुळे आमच्या शाळेचे नुकसान होत असून मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे. यावर आता वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन त्यांची इतरत्र बदली करावी अन्यथा ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत होत उद्रेक होईल यात शंका नाही.
रेवचंद वाघ, तंटामुक्त अध्यक्ष,जानोरी